केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतली रोंगे महाराजांची गळाभेट-पोस्टल अधिवेशनात अनोखा क्षण

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.३०: कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र–गोवा राज्यातील पोस्टल सेवक कर्मचाऱ्यांच्या भव्य अधिवेशनात एक अनपेक्षित आणि भावनिक क्षण उपस्थितांच्या कायम स्मरणात राहिला. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शेटफळ (ता. करमाळा) येथील वारकरी किर्तनकार व पोस्ट कर्मचारी राजाभाऊ रोंगे महाराज यांची जाहीरपणे गळाभेट घेतल्याने संपूर्ण सभागृहात आश्चर्य व कौतुकाची भावना दाटून आली.

या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सभागृहातून बाहेर पडताना सर्व पोस्टल कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे अभिवादन सुरू होते. याच वेळी धोतर, फेटा, गळ्यात वारकरी उपरणे असा पारंपरिक वेष परिधान केलेले, पोस्टाच्या कुंभेज शाखेत कार्यरत असणारे शेटफळ येथील राजाभाऊ रोंगे महाराज मंत्र्यांच्या नजरेस पडले.
वारकरी वेषातील पांडुरंगाचा भक्त समोर दिसताच मंत्री सिंधिया अचानक थांबले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पुढे जात रोंगे महाराजांची भावूकपणे गळाभेट घेतली. हा प्रसंग पाहून उपस्थित सुमारे ६ हजार कर्मचारी व अधिकारी क्षणभर स्तब्ध झाले.

शिंदे (सिंधिया) घराण्याचे महाराष्ट्राशी असलेले अतूट नाते आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांची पंढरपूरच्या विठ्ठलावर असलेली श्रद्धा याचे हे जिवंत उदाहरण ठरले. त्यांनी रोंगे महाराज यांची आपुलकीने चौकशी करत पोस्टल कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नोकरी करत असतानाच उर्वरित वेळेत वारकरी संप्रदायाचे विचार कीर्तनाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवत असल्याचे समजताच मंत्री सिंधिया अधिकच आनंदित झाले. त्यांनी पुन्हा एकदा रोंगे महाराजांची गळाभेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
हा संपूर्ण प्रसंग उपस्थितांसाठी आश्चर्याचा आणि अभिमानाचा ठरला. या भेटीतून केंद्रीय मंत्र्यांची विठ्ठलभक्ती, वारकरी परंपरेबद्दलचा सन्मान आणि महाराष्ट्राविषयीचे प्रेम स्पष्टपणे दिसून आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
या गळाभेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, अनेकांनी राजाभाऊ रोंगे महाराज यांना फोन व संदेशांद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला आहे


