वाशिंबेतील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाला धरणग्रस्त शेतकऱ्यांचा तीव्र विरोध -

वाशिंबेतील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाला धरणग्रस्त शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

0

करमाळा : वाशिंबे (ता. करमाळा) येथील गायरान गट क्रमांक १४३ मध्ये प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पामुळे धरणग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. उजनी जलाशयातून शेतजमिनींना पाणीपुरवठा करणाऱ्या अंदाजे ६० पाईपलाईन या परिसरातून जात असून, प्रकल्पाच्या कामामुळे या पाईपलाईन काढाव्या लागणार असल्याचे समोर आले आहे.


सिंचन व्यवस्थेवर गदा
या पाईपलाईनच्या माध्यमातून वाशिंबे व राजुरी गावातील शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली आहे. पाईपलाईन हटवल्यास पाणीपुरवठा पूर्णतः बंद होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अटळ असल्याची भीती व्यक्त होत आहे.


भैरवनाथ मंदिर रस्ता कायमस्वरूपी बंदची शक्यता
ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता प्रकल्पामुळे कायमस्वरूपी बंद होणार असल्याने ग्रामीण भागात नाराजी आहे. धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


निर्यातक्षम फळबागांचे अस्तित्व धोक्यात
वाशिंबे परिसर ऊस, केळी, पेरू यांसह विविध फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः वेलची केळीला आखाती देशांमध्ये व मोठ्या रिटेल मॉलमध्ये मोठी मागणी आहे. प्रकल्पामुळे या फळबागांचे अस्तित्व धोक्यात येऊन शेतकऱ्यांचे उदरनिर्वाह संकटात येण्याची शक्यता आहे.


पशुधन चाऱ्याची टंचाई
सदर गायरान जमिनीचा वापर गावातील पशुधनासाठी चारापूरवठ्यासाठी केला जातो. पशुवैद्यकीय विभागाच्या माहितीनुसार वाशिंबे गावात सुमारे ३,१४४ पशुधन आहे. सौर प्रकल्पामुळे चाऱ्याची गंभीर टंचाई निर्माण होऊन पशुपालकांवर मोठे संकट येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वाशिंबेकरांवर वारंवार भूसंपादनाचा घाला
यापूर्वी उजनी धरणामुळे ९०० एकरहून अधिक जमीन संपादित झाली असून, पुणे–सोलापूर रेल्वे मार्गासाठीही मोठ्या प्रमाणात जमीन घेण्यात आली आहे. अशातच नव्याने प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकरी अधिक अडचणीत येणार असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

प्रकल्प रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

शेतकरी व ग्रामस्थांनी प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ रद्द करा   फळबागा फुलाव्यात, ऊस मळे हिरवेगार व्हावेत आणि घराघरांत वीज पोहोचावी म्हणून आम्ही आमची गावे व भवितव्य धरणाच्या घशात घातले. सोलापूर जिल्हा सुजलाम–सुफलाम व्हावा म्हणून विकासाचा नारळ फोडताना दगड म्हणून आमचीच डोकी वापरली गेली. या त्यागाचा लाभ जिल्हा, मराठवाडा व मोठ्या शहरांना झाला. धरण आणि रेल्वे—दोन्हींसाठी जमिनी गेल्या तरी आम्ही पुन्हा उभे राहिलो. पण आता सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली धरणग्रस्तांवर पुन्हा वनवास लादला जात आहे. एकदा सर्वस्व दिलं, आता आमचं अस्तित्व तरी शिल्लक ठेवा—सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ रद्द करा.”
कल्याण मगर,वाशिंबे ता. करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!