घरकुल लाभार्थ्यांचे काम रखडले; ग्रामपंचायतीमार्फत वाळू तातडीने देण्याची मागणी

केम(संजय जाधव):शासनाने घरकुलांसाठी मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असतानाही केम येथील एकाही लाभार्थ्याला अद्याप वाळू मिळालेली नाही. केम येथे घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध न झाल्यामुळे घरकुलांचे बांधकाम रखडले असून, ग्रामपंचायतीमार्फत तातडीने वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

सध्या केम गावात एकूण ३५० घरकुले मंजूर असून, त्यांचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. मात्र घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेली वाळू उपलब्ध न झाल्याने अनेक लाभार्थ्यांना काम सुरू करता आलेले नाही. मोठ्या प्रमाणावर घरकुले मंजूर झाल्यामुळे विटांचा दर वाढून सुमारे ८,५०० रुपये झाला असून, गवंडीही सहज उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत काही लाभार्थ्यांनी मोठ्या अडचणींचा सामना करत घरकुलांचे काम सुरू केले आहे; मात्र वाळूअभावी काम अर्धवट अवस्थेत आहे.

याबाबत ग्रामसेवकांकडे विचारणा केली असता, घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळण्यासाठी अर्ज भरून घ्यायचे असून त्यासाठीचे फॉर्म उपलब्ध आहेत. मात्र सध्या नागरिक घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी भरण्यासाठी ग्रामपंचायतीत गर्दी करत असल्याने, ते काम पूर्ण झाल्यानंतरच अर्ज भरून घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.
या विलंबामुळे घरकुल लाभार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून, ग्रामपंचायतीमार्फत तातडीने वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.


