करमाळा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारतीची मागणी; आमदार नारायण पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

करमाळा(संदेश प्रतिनिधी):करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व करमाळा पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासी इमारत (वसाहत) बांधण्यात यावी, अशी मागणी करमाळा मतदारसंघाचे आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुंबई येथील मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन त्यांनी यासंदर्भात निवेदन सादर केले.

याबाबत माहिती देताना आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की, करमाळा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व करमाळा पोलीस ठाण्यात उच्च पदस्थ १० अधिकारी व सुमारे ११० पोलीस शिपाई कार्यरत आहेत. करमाळा तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असून करमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११८ गावांचा समावेश आहे.

सध्या पोलीस खात्याच्या मालकीच्या जागेत सर्वे क्रमांक ३९२८ मध्ये ब्रिटिशकालीन २३ निवासस्थाने बांधण्यात आलेली आहेत. ही निवासस्थाने ७० ते ८० वर्षे जुनी असून ती जीर्ण, मोडकळीस आलेली व धोकादायक अवस्थेत आहेत. सार्वजनिक बांधकाम उपविभाग, करमाळा येथील उपविभागीय अभियंत्यांनी या पोलीस निवासस्थानांची संरचनात्मक तपासणी केली असून ती वापरण्यास अयोग्य असल्याचे कळविण्यात आले आहे. तसेच स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात ही निवासस्थाने निष्कासित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. असे असतानाही काही पोलीस कर्मचारी अद्याप या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास आहेत.

करमाळा तालुक्यात चार साखर कारखाने असून अपघात व गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर शारीरिक व मानसिक ताण मोठ्या प्रमाणात आहे. तसेच तालुक्याबाहेरून बदली होऊन आलेल्या महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असून निवासाची सुविधा नसल्याने त्यांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला ७० पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नवीन, अद्ययावत निवासी इमारत (वसाहत) बांधण्याचे अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश देण्यात यावेत, तसेच या बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

