नेरले येथे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्टसर्किटमुळे शेताला आग; ऊसासह ठिबक, पाईप व फळझाडे जळून खाक! - Saptahik Sandesh

नेरले येथे ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्टसर्किटमुळे शेताला आग; ऊसासह ठिबक, पाईप व फळझाडे जळून खाक!

नेरले (ता. करमाळा) : नेरले येथे ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील लोखंडे यांच्या शेतातील ऊसासह शेती उपयोगी साहित्य आणि फळझाडे जळून खाक झाली आहेत. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

नेरले येथील गट क्रमांक १६ मधील लोखंडे यांच्या शेताजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीमध्ये शेतातील ऊस, उसाला टाकलेले ठिबक सिंचन संच, पाईप, भाजीपाला लागवडीसाठी लावलेले बांबू, एक एकर क्षेत्रातील शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण तसेच कृषी विभागामार्फत बांधावर लावण्यात आलेली आंब्याची झाडे जळून खाक झाली आहेत. याशिवाय अन्य शेती उपयोगी साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच जेऊर महावितरणचे अभियंता श्री. साळुंखे, वायरमन तानाजी भंडारे, कोतवाल शिवाजी काळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन  केली. तसेच नुकसानीचा पंचनामा करण्याचे आश्वासन दिले आहे.
शासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन नुकसानीचा पंचनामा करावा आणि बाधित शेतकऱ्याला योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

error: Content is protected !!