विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत कंदरच्या मल्लांची चमकदार कामगिरी; तीन मल्लांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

कंदर प्रतिनिधी : संदीप कांबळे
कंदर येथील छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुलातील मल्लांनी विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. विविध वजन गटांत प्रथम क्रमांक पटकावत तीन मल्लांनी सुवर्णयश मिळवले असून, त्यांची आगामी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे कंदर गावासह कुस्ती संकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष पै. उमेश काका इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संकुलातील मल्ल मैदानी कुस्तीसह गादी विभागातील कुस्ती प्रकारांतही सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. पै. उमेश काका इंगळे आणि कुस्ती प्रशिक्षक अण्णा नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या मल्लांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर विभागीय स्तरावर यश मिळवून संकुलाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे.
या स्पर्धेत संकुलातील खालील मल्लांनी आपापल्या वजन गटांत प्रथम क्रमांक पटकावला.
- पै. यश सुरवसे — ४१ किलो वजन गट : प्रथम क्रमांक
- पै. पृथ्वीराज जाधव — ३५ किलो वजन गट : प्रथम क्रमांक
- पै. यशराज जाधव — ६२ किलो वजन गट : प्रथम क्रमांक
या तिन्ही मल्लांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांची राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामागे नियमित सराव, मेहनत, जिद्द आणि प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.
या यशाबद्दल सर्व विजयी मल्लांचे, त्यांचे वस्ताद, पालक आणि छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुलाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही हे मल्ल उत्तम कामगिरी करून कंदर गावाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास कुस्तीप्रेमींनी व्यक्त केला आहे.


