मकाई कारखान्याने ६९ महिन्यांचे थकीत वेतन दोन महिन्यांत अदा करावे-औद्योगिक न्यायालयाचे आदेश


करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.१ : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ६९ महिन्यांचे थकीत वेतन, शासन निर्णयानुसार पगारवाढ व भत्त्यांचा फरक तसेच करारानुसार वेतनवाढीची रक्कम अदा करण्याचा आदेश सोलापूर येथील औद्योगिक न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे सेवानिवृत्त कर्मचारी बाळासाहेब काशिनाथ बोंद्रे, रा. कुगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर यांना दिलासा मिळाला आहे.

बोंद्रे यांनी मकाई सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्या विरोधात औद्योगिक न्यायालयात तक्रार दाखल केली होती. कारखान्याने नियमानुसार आपले वेतन अदा केले नाही, शासन निर्णयानुसार देय असलेली १८ टक्के पगारवाढ व त्यासोबतचे भत्ते दिले नाहीत तसेच दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजीच्या करारानुसार देय असलेली १२ टक्के वेतनवाढही दिली नसल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. सदर सर्व रकमा मुदतीत अदा कराव्यात तसेच नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती.

या प्रकरणात मकाई सहकारी साखर कारखान्याच्या वतीने म्हणणे दाखल करण्यात आले नसल्याने प्रकरण एकतर्फी चालले. त्यानंतर औद्योगिक न्यायालयाचे सदस्य एम. आर. कुंभार यांनी प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रे व तक्रारीतील मागण्यांचा विचार करून एकतर्फी निर्णय दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार जून २०१६ ते मार्च २०२२ या कालावधीतील बोंद्रे यांचे ६९ महिन्यांचे थकीत वेतन निकालाच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत अदा करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शासन निर्णयातील २०११ नुसार देय असलेली १८ टक्के पगारवाढ, भत्ते, वेतनश्रेणी व वेतन निश्चिती यांचा हिशोब करून संबंधित रक्कम तक्रारदारास अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजीच्या करारानुसार १२ टक्के वेतनवाढीचा फरक हिशोब करून तोही तक्रारदारास देण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. तसेच तक्रारदाराच्या वेतनातून वेळोवेळी कपात करण्यात आलेली प्रॉव्हिडंट फंडाची (पीएफ) रक्कम सक्षम प्राधिकरणाकडे जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

error: Content is protected !!