महाविद्यालयात जाते म्हणून घरातून निघाली-१८ वर्षाची युवती बेपत्ता

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.5 करमाळा तालुक्यातील हिवरे येथील १८ वर्षीय युवती महाविद्यालयात जाते, असे सांगून घरातून निघून गेल्यानंतर परत आली नाही. याप्रकरणी युवतीच्या आईने करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हिवरे येथील संबंधित युवती २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयात जाते, असे सांगून घरातून निघून गेली होती. मात्र, बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. महाविद्यालयात जाऊन चौकशी केली असता ती महाविद्यालयात आली नसल्याचे समजले.

त्यानंतर नातेवाईक व परिचितांकडे तसेच परिसरात शोध घेऊनही ती मिळून आली नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करीत तिच्या आईने करमाळा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.
