करमाळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी भूमिपूजन – पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सोहळा संपन्न होणार

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतीक्षित इच्छा आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. करमाळा नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन सोमवार २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता छत्रपती चौक, भवानी नाका, करमाळा येथे करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते व अध्यक्षतेखाली हा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनीताई संजय सावंत व उपनगराध्यक्ष अतुल हरिभाऊ फंड यांनी दिली. करमाळा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी व इच्छा शिवप्रेमींच्या मनात अनेक वर्षांपासून होती. आता या पुतळ्याच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक क्षण समीप आल्याने शहर व तालुक्यात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्यास करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन धोंडीराम तपसे, सर्व नगरसेवक, विविध समित्यांचे सभापती, नगरपरिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

करमाळ्याच्या वैभवात भर घालणाऱ्या या ऐतिहासिक व गौरवशाली सोहळ्यास करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमी, नागरिक, महिला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवस्मारक प्रतिष्ठान, शिवजयंती उत्सव समिती व करमाळा नगरपरिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!