विद्यागिरी महाराज जयंतीनिमित्त केम येथे ७ ऑक्टोबरला विविध धार्मिक कार्यक्रम

केम (संजय जाधव):ब्रह्मचैतन्य विद्यागिरी महाराज यांच्या २०व्या पुण्यतिथीनिमित्त ७ ऑक्टोबर रोजी श्री उत्तरेश्वर देवस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंत गिरी महाराज व श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
पुण्यतिथीनिमित्त सकाळी ८ ते १० या वेळेत सर्व समाधीस्थळे तसेच श्री उत्तरेश्वर देवस्थान येथे अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ह.भ.प. अनिरुद्ध महाराज निंबाळकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी पुष्पवृष्टी करण्यात येणार असून, त्यानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


