वीट येथील शेतकऱ्याचा दीड एकर ऊस जळून खाक! - Saptahik Sandesh

वीट येथील शेतकऱ्याचा दीड एकर ऊस जळून खाक!

करमाळा (प्रतिनिधी) : मोठ्या कष्टाने जोपासलेले आणि काढणीसाठी तयार झालेले दीड एकर ऊसपीक जळून खाक झाल्याची घटना करमाळा तालुक्यातील वीट येथे घडली. या दुर्घटनेत वीट येथील शेतकरी दादासाहेब पांडुरंग पवार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाकलेल्या विद्युत पोलवरील तारांमध्ये स्पार्किंग होऊन आग लागल्याचा आरोप शेतकऱ्याने केला असून, महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सदर घटनेबाबत शेतकरी पवार यांनी सांगितले की, वीट येथील गट क्रमांक ६२६/२/अ मधील आमच्या शेतातून महावितरणची वीजवाहिनी गेली आहे. या वाहिनीवरील विद्युत पोल गंभीररीत्या वाकलेला असल्याने तो बदलण्याची मागणी मी यापूर्वीच महावितरण कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे केली होती. तसेच पोलची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत वारंवार विनंतीही केली होती. मात्र, या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही.

दरम्यान, शनिवार, दि. ७ रोजी वाकलेल्या पोलवरील विद्युत तारांमध्ये अचानक स्पार्किंग होऊन ठिणग्या पडल्या. या ठिणग्यांमुळे उसाच्या शेताला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि सुमारे दीड एकरातील ऊस जळून खाक झाला. या आगीत अनेक टन ऊस जळाल्याने माझे यात मोठे नुकसान झाले आहे. परिसरात अशा प्रकारे ऊस जळण्याची ही दुसरी घटना असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.

एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना हाताशी आलेले ऊसपीक जळाल्याने पवार यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. विशेष म्हणजे, घटना घडूनही महावितरणचे अधिकारी अद्याप घटनास्थळी पाहणीसाठी आले नसल्याचे पवार यांनी सांगितले.

धोकादायक विद्युत पोलबाबत महावितरणला पूर्वकल्पना देऊनही वेळीच दुरुस्ती झाली असती, तर ही दुर्घटना टळली असती. महावितरणने तातडीने नुकसानीचा पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई द्यावी. तसेच साखर कारखान्याने जळालेला ऊस प्राधान्याने गाळपासाठी न्यावा,” अशी मागणी शेतकरी दादासाहेब पांडुरंग पवार यांनी केली आहे.

error: Content is protected !!