करमाळा कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा संताप; सोयाबीन पीक जाळून शासनाचा निषेध

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : तालुक्यातील सोयाबीन पिकाच्या परिस्थितीबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, करमाळा तालुका कृषी कार्यालयासमोर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने सोयाबीन पीक जाळून शासनाचा निषेध करण्यात आला. संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल बाबासाहेब घुमरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले.

सोयाबीन पिकाचे नुकसान, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच शासनाकडून अपेक्षित मदतीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी कार्यालयासमोर सोयाबीनचे पीक जाळून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.

आंदोलनादरम्यान तालुका कृषी अधिकाऱ्यांची रिकामी खुर्ची ठेवून त्यावर निवेदन देत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी अमोल घुमरे यांनी केली.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने पाहून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनामुळे करमाळा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा संताप पुन्हा एकदा समोर आला आहे.

यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल घुमरे, तानाजी शिंदे, अशोक लवंगारे, कांतीलाल शिंदे, ज्ञानेश्वर बनसोडे, सागर अंबोरे, आकाश जगताप, सचिन उबाळे, रविराज पाटील, शिवाजी तोरडमल यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!