करमाळ्यातील बॅडमिंटन कोर्ट अज्ञात व्यक्तीकडून जाळण्याचा प्रयत्न; खेळाडूंमध्ये संताप

करमाळा : शहरातील जीन मैदान येथील तालुका क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलचे शटर उघडून आतील सागवानी बॅडमिंटन कोर्ट जाळण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आल्याची घटना 15 नोव्हेंबर रोजी रात्री घडली. कोर्टवर डिझेल व पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न झाल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
करमाळा क्रीडा संकुलात आधीच विविध खेळांसाठी आवश्यक सोयी-सुविधांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत बॅडमिंटन कोर्ट खेळाडूंसाठी चांगल्या स्थितीत उपलब्ध असलेली महत्त्वाची सुविधा होती. मात्र, अज्ञात व्यक्तीने कोर्ट जाळण्याचा प्रयत्न केल्याने या सुविधेचे नुकसान झाले असून, त्याचा फटका स्थानिक बॅडमिंटन खेळाडूंना बसण्याची शक्यता आहे.
या घटनेची तालुका क्रीडा संकुलाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच नुकसान झालेल्या बॅडमिंटन कोर्टची तातडीने दुरुस्ती करून खेळाडूंसाठी ते पुन्हा उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी क्रीडाप्रेमींकडून करण्यात येत आहे.


