शेतीच्या वादातून दांपत्याला मारहाण-चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.७:
शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून झालेल्या वादातून दांपत्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना भगतवाडी (ता. करमाळा) येथे ४ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रकाश सर्जेराव गिरंजे (रा. भगतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास त्यांची पत्नी सुनीता शेतात गेली असता, अजिनाथ गिरंजे व विकास गिरंजे यांनी शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून तिला शिवीगाळ करून तिचा हात पिरगळला होता.
त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास अजिनाथ गिरंजे हे त्यांच्या घरासमोरून जात असताना प्रकाश गिरंजे यांनी पत्नी सुनीता हिचा हात का पिरगळला, असा जाब विचारला. त्यावेळी अजिनाथ यांनी, मी संपूर्ण रानात पेरणी करणार आहे, तू आडवा आलास तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत शिवीगाळ सुरू केली.

शिवीगाळ करू नका, असे सांगितल्यानंतर त्यांनी सुनील दत्तात्रय तानवडे, सुभाष दत्तात्रय तानवडे व विकास अजिनाथ गिरंजे यांना बोलावून घेतले. शेतीचा तोडगा काढू, असे सांगून त्यांना बोलावले असता वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यावेळी विकास गिरंजे यांनी प्रकाश यांच्या नाकाचा चावा घेतला, तर सुभाष तानवडे यांनी दगडाने पाठीमागून मारहाण करून जखमी केले. सुनील तानवडे यांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर अजिनाथ गिरंजे यांनी शिवीगाळ करून धमकी दिली.
या प्रकरणी अजिनाथ गिरंजे, विकास अजिनाथ गिरंजे, सुनील दत्तात्रय तानवडे व सुभाष दत्तात्रय तानवडे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!