मोबाईलमध्ये भांडणाचे शूटिंग केल्याचा राग- पिता-पुत्राला मारहाण करून केले जखमी

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.६:दुपारी झालेल्या भांडणाचे मोबाईलमध्ये शूटिंग केल्याचा राग मनात धरून सायंकाळी पुन्हा पिता-पुत्राला मारहाण करून जखमी केल्याची घटना भगतवाडी (ता. करमाळा) येथे ४ नोव्हेंबर रोजी घडली.याप्रकरणी तिघांविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिवाजी सुनीलकुमार तानवडे (रा. भगतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांच्या आत्याचे मालक आजिनाथ सर्जेराव गिरंजे व प्रकाश सर्जेराव गिरंजे यांच्यामध्ये वाद सुरू होता. यावेळी शिवाजी तानवडे यांनी या भांडणाचे मोबाईलमध्ये शूटिंग केले होते.
याच गोष्टीचा राग मनात धरून सायंकाळी सहाच्या सुमारास ते घरी जात असताना केतन महादेव गिरंजे व महादेव पंढरीनाथ गिरंजे यांनी त्यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच, आमच्या दारातील पाइपलाइन काढून टाक, अन्यथा तुला येथून अजिबात येऊ देणार नाही, अशी धमकी दिली.

त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादीचे वडील सुनीलकुमार तानवडे घरी येत असताना त्यांनाही संबंधितांनी अडवून मारहाण केली. यावेळी चप्पल, काठी व दगडाने मारहाण करून जखमी करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी केतन महादेव गिरंजे, महादेव पंढरीनाथ गिरंजे व नीलाबाई गिरंजे यांच्याविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
