कंपनीत पैसे गुंतवणुकीच्या आमिषाने तीन लाखांची फसवणूक-दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.5 : कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, सहा महिन्यांत संस्थेची कागदपत्रे व पावती मिळेल, तर पाच वर्षांनंतर गुंतवलेली रक्कम परत मिळेल, असे आमिष दाखवून रोख व बँक ट्रान्सफरद्वारे ३ लाख १५ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी कुगाव (ता. करमाळा) येथील एकनाथ हरिभाऊ वायसे यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली असून, आदित्य गणपती शिंदे व सुरेश साबळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी एकनाथ वायसे हे दरवर्षी देवदर्शनासाठी त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे जात असतात. त्यावेळी ते फॉरेस्ट कॉलनी परिसरातील देशमुख धर्मशाळेत मुक्काम करतात. याच ठिकाणी सुरेश साबळे यांनी त्यांची आदित्य गणपती शिंदे (रा. न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याशी ओळख करून दिली होती. या ओळखीतून शिंदे याने आपण पॅन कार्ड कंपनीत एजंट म्हणून काम करत असल्याचे सांगितले. तसेच, तुमच्या गावात येऊन तुम्हाला फायद्याची गुंतवणूक करून देतो, असे आश्वासन दिले.

त्यानुसार १ मे २०२५ रोजी आदित्य शिंदे व सुरेश साबळे हे कुगाव येथे कार घेऊन मुक्कामी आले. त्यावेळी त्याने कंपनीत १० लाख रुपये गुंतविल्यास चांगला आर्थिक फायदा होईल, असे वायसे यांना सांगितले. मात्र, एवढी रक्कम उपलब्ध नसल्याचे सांगितल्यानंतर किमान ३ लाख १५ हजार रुपये गुंतविण्याचा आग्रह करण्यात आला.
त्यावर विश्वास ठेवून वायसे यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आपल्या खात्यातून एक लाख रुपये काढून शिंदे याच्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर केले. उर्वरित दोन लाख १५ हजार रुपये त्यांनी वेळोवेळी रोख स्वरूपात काढून चिखलठाण येथील एका हॉटेलमध्ये शिंदे याच्याकडे दिले.
पैसे स्वीकारल्यानंतर पावती देतो, संस्थेची सर्व कागदपत्रे देतो, सहा महिन्यांत कागदपत्रे मिळतील आणि पाच वर्षांनंतर तुमची संपूर्ण रक्कम परत मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, सहा महिने उलटूनही कोणतीही पावती किंवा कागदपत्रे मिळाली नाहीत. त्यामुळे मार्च २०२६ मध्ये वायसे यांनी संबंधितांकडे पैशांची व कागदपत्रांची मागणी केली. परंतु, त्यांनी पैसेही परत केले नाहीत आणि कागदपत्रेही दिली नाहीत. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी एकनाथ वायसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य गणपती शिंदे व सुरेश साबळे या दोघांविरुद्ध करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!