शुल्लक कारणावरून तरुणावर काठीने हल्ला-चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल


करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.१७:गाडीचा हॉर्न का वाजवला या क्षुल्लक कारणावरून तरुणाला बेदम मारहाण करून डोक्यात काठीने मारून गंभीर जखमी केल्याची घटना केडगाव (ता. करमाळा) येथे घडली. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यात तरुणाची आई मंगल संतोष ससाणे यांनी फिर्याद दिली. त्यात त्यांनी म्हटले, की ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास माझा मुलगा कार्तिक संतोष ससाणे व त्याचा मित्र रुपेश बोराडे हे दोघे दुचाकीवरून किराणा सामान आणण्यासाठी गावात गेले होते. किराणा माल घेऊन परत येत असताना बस स्टँडजवळ संतोष गायकवाड यांनी दुचाकी अडवून “गाडीचा हॉर्न का वाजवला?” असा जाब विचारत शिवीगाळ सुरू केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली, तर विक्की गायकवाड व साहेबराव गायकवाड यांनी कार्तिकला पकडून ठेवले.

याच वेळी जालिंदर गायकवाड याने कार्तिकच्या डोक्यात पाठीमागून काठी जोरात मारून त्याला रक्तबंबाळ केले. या गोंधळात माझ्या मुलाचा मोबाईलही गहाळ झाला आहे. जखमी कार्तिकवर करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले . संतोष गायकवाड, जालिंदर गायकवाड, विक्की गायकवाड आणि साहेबराव गायकवाड (सर्व रा. केडगाव) यांच्याविरुद्ध करमाळा पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार शेख पुढील तपास करत आहेत.

error: Content is protected !!