गणेशोत्सवाच्या पारंपरिक जल्लोषाला सामाजिक व वैचारिक उपक्रमाची जोड - करमाळ्यात ‘मी सावित्री ज्योतिराव फुले’ नाट्यप्रयोग - Saptahik Sandesh

गणेशोत्सवाच्या पारंपरिक जल्लोषाला सामाजिक व वैचारिक उपक्रमाची जोड – करमाळ्यात ‘मी सावित्री ज्योतिराव फुले’ नाट्यप्रयोग

करमाळा : गणेशोत्सवाच्या पारंपरिक जल्लोषाला सामाजिक व वैचारिक उपक्रमाची जोड देत वेताळ पेठ, करमाळा येथील स्वराज्य ग्रुपने यंदा डीजे-बँजोवरील खर्चाला फाटा देत ‘मी सावित्री ज्योतिराव फुले’ या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची व विचारांची ओळख करून देण्यात आली.

कुमारी देवयानी फुले यांनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका प्रभावीपणे साकारली. सावित्रीबाईंचा संघर्ष, मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य आणि समाजपरिवर्तनाचा विचार त्यांनी आपल्या अभिनयातून विद्यार्थ्यांसमोर मांडला.

कार्यक्रमास DYSP अंजना कृष्णा, करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत, कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या खाटमोडे, न.प. सेंट्रल स्कूल क्रमांक १च्या मुख्याध्यापिका माने, न.प. मुलींची शाळा क्रमांक २चे मुख्याध्यापक शिंदे, जोशी, न.प. मुला-मुलींची शाळा क्रमांक ३चे मुख्याध्यापक पारेकर, करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. योगेश शिंपी यांच्यासह विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना DYSP अंजना कृष्णा यांनी स्वराज्य ग्रुपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.

गणेशोत्सवाचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी न करता विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या उपक्रमासाठी करण्याचा प्रयत्न स्वराज्य ग्रुपने केला. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख नव्या पिढीला व्हावी, शिक्षणाचे महत्त्व समजावे आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश पोहोचावा, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना स्वराज्य ग्रुपच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. उत्सवातील पारंपरिक खर्चाला पर्याय देत सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी कौतुक केले.

error: Content is protected !!