ज्याला आई कळली त्याला बाई कळली: देवा झिंजाड - Saptahik Sandesh

ज्याला आई कळली त्याला बाई कळली: देवा झिंजाड

करमाळा(प्रतिनिधी)”ज्याला आई कळली त्याला बाई कळली, आई नावाचे मातृपीठ जगातील अनेक विद्यापीठांपेक्षा मोठे असते”  हा भावविचार येथील सर्वोदय प्रतिष्ठान आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पामध्ये आपले विचार व्यक्त करत असताना प्रसिद्ध लेखक, कवी व ‘एक भाकर तीन चुली’ या विक्रमी कादंबरीचे लेखक देवा झिंजाड यांनी व्यक्त केला.

काळ बदलला मात्र महिलांच्या समस्या बदलल्या नाहीत फक्त त्यांचे स्वरूप बदललं  आणि म्हणून शिक्षणाची महती जाणणारी आई सादर करताना लेखणी ही अन्यायाला वाचा फोडते आणि साहित्य समाजाचा आरसा असते असे प्रतिपादन देवा झिंजाड यांनी यावेळी केले. श्रोत्यांना खिळवून ठेवणाऱ्या शैलीमध्ये उपस्थितांच्या मनाचा ठाव घेणारे मनोगत आणि काव्य वाचनाने त्यांनी रसिकांची मने जिंकली.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना समाज समजून घ्यायचा असेल तर पुस्तके आणि डिग्री पेक्षाही अनुभव महत्त्वाचा असतो आणि जिवंत पणे आई-वडिलांची केलेली सेवा ही श्रेष्ठ असते असा मार्मिक संदेश विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी दिला. यावेळी साहित्यिक डॉ. सुरेश शिंदे, यश कल्याणीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गणेश करे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने, पक्षीमित्र कल्याणराव साळुंखे, बाळकृष्ण लावंड, नरारे सर, संतोष पाचे, सर्वोदय प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व विविध क्षेत्रातील रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

या व्याख्यानमालेसाठी सचिव अमरजीत साळुंखे, प्रसाद कुलकर्णी, सुधीर माने, अजित कणसे, सुनील पवार, मनोज कुलकर्णी, जयेश पवार, अतुल दाभाडे, संतोष कांबळे, ऋतुराज शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले. व्याख्यान संपल्यानंतर देवा झिंजाड यांची एक भाकर तीन चुली ही विक्रमी खपाची कादंबरी घेण्यासाठी वाचकांची अक्षरशः झुंबड उडाली.  दरम्यान प्रास्ताविक सर्वोदयचे अध्यक्ष दीपक चव्हाण, सूत्रसंचालन प्रा  विष्णु शिंदे तर आभार सुधीर माने यांनी मानले.

error: Content is protected !!