मनोहरमामा भोसले वर आणखी एक गुन्हा दाखल

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१७: स्वतःला बाळूमामाचा अवतार भासवून दैवी शक्तीच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या उंदरगाव (ता. करमाळा) येथील मनोहर मामा भोसले व त्याचा शिष्य विशाल वाघमारे या दोघांवर करमाळा पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

मांजरी (पुणे) येथील बांधकाम व्यावसायिक विशाल मस्के यांच्या मुलीच्या विवाहाबाबत मार्गदर्शन व पत्नीला उपसरपंच करण्याचे आमिष दाखवून आरोपींनी पूजेच्या नावाखाली १ लाख रुपये आणि दर्शनाची पावती म्हणून ५,००० रुपये घेतले. याशिवाय मुलांच्या शिक्षणासाठी मस्के यांचे पुण्यातील दोन फ्लॅट भाड्याने घेऊन त्याचे ६३ महिन्यांचे भाडे व डिपॉझिट असे ७ लाख ५६ हजार रुपये थकवून एकूण ८ लाख ६१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा, २०१३ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील फसवणूक व विश्वासघाताच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने पुढील तपास करत आहेत.


