आवाटी येथील मनीषा खताळची MPSC परीक्षेत यशस्वी भरारी; मुलींमध्ये राज्यात तृतीय

करमाळा(प्रतिनिधी) : मौजे आवाटी, ता. करमाळा येथील शेतकरी कुटुंबातील कु. मनीषा सविता मोहन खताळ हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत दुय्यम निबंधक, सहाय्यक महसूल अधिकारी पदावर निवड झाली असून, मुलींमध्ये तिने राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आवाटी येथे भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
मनीषा खताळ हिचे प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आवाटी येथे झाले. माध्यमिक शिक्षणासाठी तिने डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालय, गौंडरे येथे झाले. दहावी मध्ये ९२ टक्के गुण मिळवत ती विद्यालयात प्रथम आली. नंतर बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेताना तिने ८७.२३ टक्के गुण मिळविले. त्यानंतर पुढील शिक्षण बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयात घेतले.विज्ञान शाखेतून पदवी पूर्ण करताना तिने ८७.३६ टक्के गुण मिळवून विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला.
शेतकरी कुटुंबातील परिस्थितीशी जुळवून घेत मनीषाने शिक्षणाबरोबरच वडिलांना शेतीच्या कामातही हातभार लावला. शेतात खुरपणी करणे, ऊसाला खत टाकणे आदी कामे करत तिने आपले शिक्षण सुरू ठेवले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी मनीषा मागील तीन वर्षांपासून पुणे येथे होती. सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने MPSC परीक्षेत यश मिळवत दुय्यम निबंधक, सहाय्यक महसूल अधिकारी पदाला गवसणी घातली.
तिच्या यशाचे गमक विचारले असता, “जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यातूनच यश मिळते. जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत अविरतपणे प्रयत्न केले पाहिजेत,” असे मनीषा खताळ हिने सांगितले.
सत्कार समारंभास बाबुभाई मुलाणी, साजिद मुलाणी, ताहेर खान, नानासाहेब खताळ (तलाठी), मनीषाचे वडील मोहन खताळ, विश्वनाथ शिंदे, दीपक शिंदे आदी उपस्थित होते.


