रोपांबाबत फसवणूक झाल्याच्या तक्रारीवर कार्यवाही होत नसल्याने महिला शेतकऱ्याचा उपोषणाचा इशारा

करमाळा : कृषी विभागाने दिलेल्या लेखी आश्वासनाची तत्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी गुळसडी येथील महिला शेतकरी रत्नमाला सुनील गायकवाड यांनी २ ऑक्टोबर २०२६ रोजी तहसीलदार कार्यालयासमोर कुटुंबासहित आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
जैन केळी रोपांबाबत फसवणूक झाल्याची तक्रार गायकवाड यांनी संबंधित विभागाकडे केली होती. याबाबत त्यांनी १८ मार्च, २७ मे आणि ८ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारी केल्या. मात्र, तक्रारीवर कार्यवाही होत नसल्याने त्यांनी १५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते.
त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते. या आश्वासनानुसार तालुका तक्रार निवारण समितीचा अहवाल पाच दिवसांत सादर करणे, संबंधित प्रकरणाची तालुक्याबाहेरील अधिकाऱ्यांच्या भरारी पथकामार्फत विशेष चौकशी १५ दिवसांत करणे, संबंधित डीलरची विशेष चौकशी करून अहवाल सादर करणे तसेच तक्रार निवारण समितीच्या अहवालाच्या आधारे नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी ग्राहक न्यायालयात सहाय्य करणे, अशी कार्यवाही अपेक्षित होती.
मात्र, दिलेल्या लेखी आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नसल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला असून, याबाबतचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे.
तक्रार निवारण समितीच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी
तक्रार निवारण समितीच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी. तक्रार निवारण समितीच्या सचिवांनी त्यांना तालुका अध्यक्षांच्या दालनात बोलावून दबाव आणून कोऱ्या अहवालावर स्वाक्षरी घेतली. या संपूर्ण प्रकाराची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी.
– रत्नमाला गायकवाड, पीडित महिला शेतकरी, रा. गुळसडी



