
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील दिवेगव्हाण येथील पारेवाडी तलाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी १० शेतीपंप फोडून त्यातील तब्बल १०५ किलो तांब्याच्या तारा लंपास केल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक फटका बसला आहे.

याप्रकरणी अभिमन्यू संभाजी खाटमोडे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४६/२०२६ नुसार BNS कलम ३०३(२) व ३२४(२) अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल सुहास विठ्ठल पवार करीत आहेत. चोरट्यांनी अभिमन्यू खाटमोडे, गणपत खाटमोडे, सतीश खाटमोडे, भरत खाटमोडे, अक्षय तनपुरे आणि उमेश खाटमोडे यांच्या १५ एचपीच्या नऊ व ७.५ एचपीची एका मोटारीची तोडफोड केली. मोटारींचे कव्हर व इतर भाग फोडून त्यातील तांब्याच्या तारा काढून नेण्यात आल्या. एफआयआरमध्ये चोरीच्या मालाचे मूल्य ७३ हजार ५०० रुपये नमूद करण्यात आले आहे.


उजनी बॅकवॉटर परिसरातील वाशिंबे, जिंती, पारेवाडी, केत्तूर, गोयेगाव, सोगाव व राजुरी परिसरात यापूर्वीही शेतीपंप चोरीच्या घटना घडल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. त्यामुळे या घटनांची साखळी तपासून चोरट्यांचा शोध घ्यावा, रात्रीची गस्त वाढवावी आणि विशेष तपास पथक नेमून चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दुष्काळामुळे पिके जगवण्यासाठी शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना शेतीपंपांची तोडफोड झाल्याने सिंचन व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून तातडीने मदत करावी, अशी मागणीही होत आहे.



