दीपावली पाडव्यानिमित्त कमलाभवानी मंदिरात शिवरायांचा अभिषेक अन् भव्य दीपोत्सव उत्साहात

करमाळा (प्रतिनिधी) : दीपावली पाडव्याच्या मंगलमय पर्वानिमित्त श्री कमलाभवानी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक, वैदिक पूजन आणि भव्य दीपोत्सव सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.
सकाळी ८.३० वाजता माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख, सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड, इतिहास संशोधक संग्राम परदेशी, ग्लोबल सायन्स अकॅडमीचे निकत आणि वाय.सी.एम. कॉलेजचे प्रा. लक्ष्मण राख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. यावेळी रवीराज पुराणिक यांनी वैदिक पूजन विधिवत पूर्ण केले.

सायंकाळी ७ वाजता साहित्यिक अंजली श्रीवास्तव, नगरसेविका स्वाती फंड, सारिका विजय मोरे, निशा अजित कनसे आणि आरती दीपक दिवाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर पहिला दीप प्रज्वलित करून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर संपूर्ण मंदिर परिसर शेकडो दीपज्योतींनी उजळून निघाला.

रात्री ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य आरती करण्यात आली. उपनगराध्यक्ष अतुल फंड, जातेगावचे उद्योजक विक्रम शिंदे, नगरसेवक दीपक चव्हाण, मराठा महासंघाचे अध्यक्ष सचिन काळे, श्रीदेवीचामाळ येथील बागायतदार अंगद बिडवे आणि शेखर जोगळेकर यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.

या सोहळ्यास आयोजक राजेंराव रंभा अन्नदान मंडळाचे सर्व सदस्य, मंदिराचे पुजारी, ग्रामस्थ, महिला, युवक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर, दीपज्योतींचे मांगल्य आणि आई कमलाभवानी मातेच्या भक्तिमय वातावरणामुळे यंदाचा दीपावली पाडवा विशेष उत्साहात साजरा करण्यात आला.

