नम्रता रणसिंग- शिंदे यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले महिला गौरव पुरस्कार जाहीर - Saptahik Sandesh

नम्रता रणसिंग- शिंदे यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले महिला गौरव पुरस्कार जाहीर

नम्रता रणसिंग- शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.१५:
खातगाव, ता. करमाळा येथील रहिवासी व अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात समाजसेवा अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या नम्रता सिंधुदेवी राजेंद्र रणसिंग तथा सौ. नम्रता शिवाजी शिंदे यांना राज्यस्तरीय ‘न्यायहक्क समताशाही सावित्रीबाई फुले महिला गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या समाजसेवा आणि आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मेहकर (जि. बुलढाणा) येथील लोकसेवा क्रीडा व शिक्षण बहुउद्देशीय संस्था, मारोतीपेठ यांच्या वतीने दैनिक न्यायहक्क समताशाही आणि जानेफळ एक्सप्रेस यांच्या संयुक्त वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष अशोकभाऊ शेजूळ आणि पुरस्कार निवड समितीचे अनिल भगवान चव्हाण यांनी
हा पुरस्कार जाहीर केला आहे.

नम्रता रणसिंग- शिंदे या अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समाजसेवा विभागात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आरोग्यविषयक जनजागृती करण्यासोबतच एचआयव्ही आणि सिकलसेल अ‍ॅनिमियासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी त्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. तसेच दिव्यांग किशोरवयीन मुलींसाठी जनजागृती अभियान, विविध आरोग्य शिबिरे आणि समाजहिताचे उपक्रम आयोजित करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विविध जबाबदाऱ्या सांभाळताना सामाजिक उपक्रमांसाठी सीएसआर निधी उपलब्ध करून देण्यासाठीही त्या प्रयत्नशील असतात. आरोग्य क्षेत्रातील जनजागृती, वंचित घटकांना मदत आणि सामाजिक बांधिलकी जपणारे त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत जानेवारी २०२७ मध्ये मेहकर, जिल्हा बुलढाणा येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना राज्यस्तरीय ‘न्यायहक्क समताशाही सावित्रीबाई फुले महिला गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

खातगाव येथील रहिवासी व सोलापूर जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी राजेंद्र रणसिंग  यांच्या नम्रता रणसिंग कन्या आहेत.  राज्यस्तरावरील हा सन्मान जाहीर झाल्याने,  विविध क्षेत्रांतून व्यक्तींनी तसेच ग्रामसुधार समितीने त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!