सेवाधर्माचे व्रत घेतलेले- बंडूकाका

गोविंद उर्फ बंडुकाका कुलकर्णी

करमाळा: “आयुष्य जगणारे अनेक असतात;
पण आपल्या जगण्याने इतरांचे आयुष्य समृद्ध करणारे  फार थोडे असतात…
काही माणसं आपला कार्यभार संपल्यावर समाजसेवेचे काम हाती घेतात, तर काही माणसांचं संपूर्ण आयुष्यच समाजसेवेचा एक अखंड प्रवास बनून जातो. त्यांच्या जीवनाकडे पाहिलं की, “हा माणूस सेवा करण्यासाठीच जन्माला आला की काय.? ,” असं सहज वाटतं. त्याच परंपरेतील
पोथरे, (ता. करमाळा ) येथील टपाल कार्यालयाचे सेवानिवृत्त पोस्टमास्तर गोविंद म्हाळसाकांत कुलकर्णी उर्फ ‘बंडूकाका’ हे एक आहेत.
दि. ४ ऑक्टोबर रोजी वयाची ८० वर्षे पूर्ण करून ते ८१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.  वय वाढलं असली तरी त्यांचा उत्साह, शिस्त, वाचनाची आवड, व्यायामाची सवय आणि समाजासाठी काम करण्याची धडपड आजही तरुणांना लाजवेल अशीच आहे.
लहानपणापासूनच त्यांच्या जीवनात संस्कारांची आणि सेवाभावाची मुहूर्तमेढ रोवली. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत शिक्षण घेत असतानाच गावातील पौरोहित्याची
ची कामे, देवदेवतांची पूजा-अर्चा या बरोबरच त्यांनी शिक्षण घेतले. वयाची १८ वर्षे पूर्ण होताच, १९व्या वर्षी त्यांनी टपाल खात्यात सेवेला सुरुवात केली. सन १९६४ मध्ये एक्स्टर्नल डिपार्टमेंट कर्मचारी म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे पोस्टमन, मेलओरशर, क्लार्क आणि पोस्टमास्तर अशा विविध जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचला. तब्बल ३९ वर्षे प्रामाणिक सेवा करून ते २००३ मध्ये  सेवानिवृत्त झाले.
पण बंडू काकांसाठी निवृत्ती म्हणजे कामाचा शेवट नव्हता; तर त्यांच्या समाजसेवेच्या दुसऱ्या पर्वाचा प्रारंभ होता. गेली २३ वर्षे ते सातत्याने विविध सामाजिक, धार्मिक आणि पारमार्थिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत.
ग्रंथांचे वाचन,प्रवचण,भजन आणि लोकांना मार्गदर्शन,दिंडीमध्ये सहभाग, मंदिरांची कामे, गावची स्वच्छता, जलस्वराज्य योजनेत त्यांनी सचिव म्हणून काम केले.अशा विविध  उपक्रमात  बंडू काकांचा सहभाग कायम राहिला आहे.  समाजसेवा आणि पारंपरिक धार्मिक कार्य यांचा सुंदर समन्वय त्यांच्या जीवनात पाहायला मिळतो.
त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी वैशिष्ट्ये म्हणजे शिस्त आणि नियम. व्यायाम वेळेवर, जेवण वेळेवर, काम वेळेवर आणि वाचनासाठी वेळ—हा त्यांचा दिनक्रम आजही कायम आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी आपल्या जीवनातील हा नियम कधी सोडला नाही.
त्यांचे वडील म्हाळसाकांत कुलकर्णी, ज्यांना लोक ‘दादा’ म्हणून ओळखत होते, ते तलाठी म्हणून कार्यरत होते. आई लक्ष्मीबाई या गृहिणी. प्रभाकर हे ज्येष्ठ बंधू आता हयात नाहीत. बेबीताई, कमलताई आणि पुष्पाताई या तीन भगिनींपैकी बेबीताई आणि कमलताई यांचे निधन झाले असून पुष्पाताईंचा सुखी संसार चालू आहे. अशा संस्कारक्षम कुटुंबातून बंडू काकांची जडणघडण झाली.
सन १९७४ मध्ये चापडगाव येथील भास्करराव कुलकर्णी यांच्या कन्या उषाताई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बंडू काकांच्या जीवनप्रवासात उषाताईंचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. पतीच्या स्वभावाला आणि सेवाभावी वृत्तीला साजेसा त्यांचा स्वभाव. दोघांनीही संसार सांभाळताना परमार्थ आणि सामाजिक कार्याची वाट तितक्याच उत्साहाने चालत ठेवली.
बंडू काकांना बाळासाहेब उर्फ प्रसाद आणि अमोल अशी दोन मुले. दोघेही पदवीधर असून अमोल शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. एक ‘प्रतिभा’ नावाची कन्या असून ती शिक्षिका आहे. सुना, नातवंडे असा त्यांचा संसार सुखाने सुरू आहे. कमी आहे ती उषाकाकुंची. त्या आज हयात नाहीत.
काकांनी सेवानिवृत्तीनंतरही  गावातील विविध पारंपरिक कामे, धार्मिक विधी आणि पौरोहित्याची कामे उत्साहाने सुरू ठेवली. त्यामुळे एका बाजूला आधुनिक काळातील सामाजिक कार्य आणि दुसऱ्या बाजूला आपल्या परंपरेशी असलेली नाळ—या दोन्हींचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो.
आज ते ८१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. मागे वळून पाहिले तर ३९ वर्षांची प्रामाणिक शासकीय सेवा आणि त्यानंतरची २३ वर्षांची अविरत समाजसेवा असा प्रदीर्घ सेवाप्रवास त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या आयुष्याचा हा प्रवास म्हणजे खर्‍या अर्थाने ‘सेवाधर्माचा प्रवास ’ आहे.
“देह थकला तरी सेवा थांबत नाही,
वय वाढले तरी उत्साह कमी होत नाही;
ज्यांच्या श्वासाश्वासात परमार्थ असतो,
त्यांच्या आयुष्याला निवृत्ती कधीच असत नाही…”
बंडू काकांसारखी माणसं ही गावाची खरी संपत्ती असतात. त्यांच्याकडून मिळणारे संस्कार,  शिस्त,  सेवाभाव आणि साधी राहणी ही पुढच्या पिढीसाठी एक मोठी शिकवण आहे.
बंडू काकांना परमेश्वराने उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य द्यावे. त्यांचा शताब्दी महोत्सव तर आपण नक्कीच साजरा करू; पण त्याही पुढील रोप्यमहोत्सवाचा आनंद घेण्याचे भाग्य त्यांना लाभावे, हीच श्री पांडुरंगाच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना!


—डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे,करमाळा.मो.न 9011355389

error: Content is protected !!