नेरले येथे शॉर्टसर्किटमुळे ऊसासह ठिबक सिंचन साहित्य व फळझाडे जळून खाक

करमाळा: नेरले (ता. करमाळा) येथे ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील लोखंडे यांच्या शेतातील ऊस, ठिबक सिंचन साहित्य, शेती उपयोगी साहित्य तसेच फळझाडे जळून खाक झाली. या घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

लोखंडे यांच्या गट क्रमांक १६ मधील शेताजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत ऊस पिकासह उसाला टाकलेले ठिबक सिंचन संच, पाईप, भाजीपाला पिकासाठी उभारलेले बांबू, एक एकर क्षेत्रातील शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून बांधावर लावण्यात आलेली आंब्याची झाडे जळून खाक झाली. याशिवाय अन्य शेती उपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच जेऊर येथील महावितरणचे अभियंता साळुंखे, वायरमन तानाजी भंडारे, कोतवाल शिवाजी काळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नुकसानीचा पंचनामा करण्याचे आश्वासन दिले.
आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना या आगीमुळे लोखंडे यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसानीचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

