सोलापूर DCC बँकेच्या संचालकपदी शंभूराजे जगताप यांची बिनविरोध निवड

करमाळा : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत करमाळा तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून शंभूराजे जयवंतराव जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याने करमाळा तालुक्यात जगताप गटाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. करमाळा शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली.
सोसायटी मतदारसंघातील उमेदवार सुभाष गुळवे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या मतदारसंघात शंभूराजे जगताप यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर जगताप गटाच्या वतीने युवा नेते तथा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप यांची भाजपप्रणित पॅनेलकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली होती.
शंभूराजे जगताप यांच्या संचालकपदी निवडीमुळे जगताप कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे सहकारी बँकेच्या राजकारणात पदार्पण झाले आहे. यापूर्वी कै. नामदेवराव जगताप यांनी बँकेचे चेअरमन व संचालक म्हणून, तर जयवंतराव जगताप यांनी उपाध्यक्ष व संचालक म्हणून प्रदीर्घ काळ काम पाहिले आहे. आता शंभूराजे जगताप यांच्या रूपाने जगताप कुटुंबाची तिसरी पिढी बँकेच्या संचालक मंडळात दाखल झाली आहे.


