पाडळीत ६० गरजू कुटुंबांची दिवाळी गोड!

सुभाष कुलकर्णी व परिवाराच्या वतीने दिवाळी साहित्य किटचे वाटप; सामाजिक बांधिलकीचे दर्शन

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : दिवाळीचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि चैतन्य घेऊन येतो. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना सण साजरा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उदात्त हेतूने पाडळी (ता.करमाळा) येथील सुभाष कुलकर्णी व परिवार यांच्या वतीने शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी आपल्या गावी पाडळी येथे अत्यल्प उत्पन्न असलेल्या ६० कुटुंबांना दिवाळी साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

समाजातील गरजू कुटुंबांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा आणि त्यांच्या घरातही आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, या भावनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून सुभाष कुलकर्णी व परिवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचा संदेश दिला. गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा प्रयत्न ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच अनिल पिंपरे, अध्यक्ष गोतिराम पवार, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन शहाजी शिंगटे, ग्रामस्थ सुनील कुलकर्णी, शिक्षक जाधवर गुरुजी तसेच मित्र व करमाळावासी प्रदीप शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्यामुळे हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सुभाष कुलकर्णी व परिवार यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविणे आवश्यक आहे. सण-उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, सहकार्य आणि माणुसकीची भावना अधिक दृढ होते. गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरला असून, अशा सेवाभावी कार्यातून समाजात सकारात्मकतेचा प्रकाश पसरत आहे.

error: Content is protected !!