दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन एक महिना आधी सुरू करण्यात यावे - शिंदे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी - Saptahik Sandesh

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन एक महिना आधी सुरू करण्यात यावे – शिंदे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

करमाळा : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आक्रमकपणे पाठपुरावा सुरू केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन सन २०२६-२७ साठी मंजूर असलेले ०.५७ टीएमसी पाणी कायम ठेवून १५ डिसेंबरऐवजी १५ नोव्हेंबर २०२६ पासून आवर्तन सुरू करण्याची मागणी केली आहे.

उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनी धरणातील एकूण ३७.३९ टीएमसी पाण्याच्या वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी १५ डिसेंबर २०२६ ते १० फेब्रुवारी २०२७ या कालावधीत ०.५७ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. मात्र, ही योजना दोन टप्प्यांत कार्यरत असून उजनी धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतर जुन्या पंपांमुळे पाण्याचा विसर्ग कमी होतो. आगामी काळात धरणातील पाणीसाठा उणे पातळीकडे जाण्याची शक्यता असल्याने मंजूर पाणी पूर्ण क्षमतेने उचलण्यात तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आवर्तनाच्या तारखेत बदल करणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, घोटी, निंभोरे, फिसरे, सरपडोह, पांडे, शेलगाव (क) आदी गावांमध्ये सध्या टँकरद्वारे केवळ मनुष्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जात आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशा परिस्थितीत १५ नोव्हेंबरपासून आवर्तन सुरू झाल्यास संबंधित गावांतील पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळेल. तसेच जनावरांच्या पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल.

मंजूर ०.५७ टीएमसी पाणी कायम ठेवून आवर्तन १५ नोव्हेंबरपासून सुरू करावे, अशी मागणी संजयमामा शिंदे यांनी केली आहे. योजनेच्या तांत्रिक बाबींची तातडीने तपासणी करून कालवा सल्लागार समितीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नासाठी संजयमामा शिंदे यांनी पुढाकार घेतल्याने त्यांच्या मागणीवर शासन व प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे लाभक्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!