शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी टेंभुर्णी-करमाळा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी रस्त्यावर; कुंभेज फाटा येथे महामार्ग रोखला

केम (संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. २० नोव्हेंबर) कुंभेज फाटा येथे टेंभुर्णी-करमाळा महामार्गावर जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर करमाळा तालुक्यातील उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या नऊ मागण्यांसाठी परिसरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास महामार्ग रोखून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजाभाऊ कदम यांनी यापूर्वीच दिला होता. त्यानुसार गुरुवारी कुंभेज फाटा येथे मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र आले आणि रास्ता रोको करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

शेतकऱ्यांच्या नऊ प्रमुख मागण्या

या आंदोलनाच्या माध्यमातून बहुजन संघर्ष सेनेने शासनाकडे नऊ प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये :

या आंदोलनाच्या माध्यमातून बहुजन संघर्ष सेनेने शासनाकडे खालील नऊ मागण्या केल्या.
१. कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर करमाळा तालुक्यातील उसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर मिळावा.
२. उजनी धरणाच्या काठावरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दररोज आठ तास वीजपुरवठा करण्यात यावा.
३. दहिगाव स्टेशन उपसा सिंचन योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करण्यात यावे.
४. सन २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे प्रलंबित अनुदान वंचित शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावे.
५. सन २०२६ मधील दुष्काळ निधीची पाच हजार रुपये अग्रीम मदत वंचित शेतकऱ्यांना देण्यात यावी.
६. सातबारा उताऱ्यावर सामायिक क्षेत्राची नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाही दुष्काळ निधीचा लाभ देण्यात यावा.
७. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे प्रलंबित हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावेत.
८. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मंजूर लाभार्थ्यांना प्रलंबित अनुदान तातडीने देण्यात यावे.
९. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बंद पडलेले महिलांचे हप्ते पुन्हा सुरू करून थकीत रक्कम देण्यात यावी


मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

यावेळी बोलताना राजाभाऊ कदम यांनी शासन व प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला. करमाळा तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी, दुष्काळ, अपुरा वीजपुरवठा आणि उसाला मिळणारा कमी दर अशा अनेक संकटांचा सामना करत आहेत. अतिवृष्टीचे अनुदान अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाही, तर दुष्काळ निधीपासूनही अनेक शेतकरी वंचित आहेत. उजनी काठावरील शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतीचे नियोजन करणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत उसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाने शेतकऱ्यांच्या नऊही मागण्यांची तातडीने दखल घेऊन त्या मंजूर कराव्यात. केवळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही मोठे आणि तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी बहुजन संघर्ष सेनेचा लढा यापुढेही सुरूच राहील, असा निर्धार कदम यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सुपूर्द

आंदोलनाच्या शेवटी शेतकऱ्यांच्या नऊ प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे शासनाचे प्रतिनिधी भंडारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यांनी हे निवेदन स्वीकारले. आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक पी. आय. माने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा सहभाग

या रास्ता रोको आंदोलनात पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, विद्यमान उपसभापती अजित विघणे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे, पंचायत समिती सदस्य स्वप्निल काळे, सरपंच संजय तोर्मल, अंकुश शिंदे, युवराज मगर, विनोद सरडे, उदय देशमुख, राजाभाऊ देशमुख, भारत रोकडे, आदिनाथ कारखान्याचे संचालक दत्तू गव्हाणे, दादासाहेब लबडे, अविनाश सरडे, प्रहारचे संदीप तळेकर, विष्णू रंधवे, विनोद शिंदे, संदीप मारकड, सर्जेराव रिटे यांच्यासह विविध गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो शेतकरी उपस्थित होते.

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरल्याने शासन या नऊ मागण्यांबाबत काय भूमिका घेणार, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!