राहीबाईंच्या बीजसंवर्धनाच्या विचारांना सलाम; करमाळ्यात २० समाजरत्नांचा गौरव!


यशकल्याणी सेवाभवनात प्रेरणादायी स्नेहमेळावा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान

करमाळा | संदेश प्रतिनिधी : समाजाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या हातांचा सन्मान आणि निसर्गाशी नाते जपणाऱ्या विचारांचा जागर, असा अनोखा संगम करमाळ्यातील यशकल्याणी सेवाभवन येथे आयोजित जिव्हाळा स्नेहमेळाव्यात पाहायला मिळाला. पद्मश्री बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांच्या प्रेरणादायी विचारांनी कार्यक्रमाला वैचारिक दिशा मिळाली, तर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विविध विधायक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १९ व्यक्तींसह एका संस्थेचा गौरव नुकताच करण्यात आला.

यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे, ग्रामसुधार समिती आणि जिव्हाळा ग्रुप, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या मनोगतातून पारंपरिक बियाण्यांचे महत्त्व, जैवविविधतेचे संवर्धन आणि मातीशी असलेले नाते यावर प्रकाश टाकला. ग्रामीण संस्कृतीत दडलेले ज्ञान, निसर्गाविषयीची बांधिलकी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून साध्य होणारे मोठे कार्य यांचा त्यांनी आपल्या अनुभवातून उलगडा केला. त्यांच्या विचारांनी उपस्थितांना निसर्गसंवर्धनाची नवी प्रेरणा दिली.

विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव

या सोहळ्यात प्राचार्य आतिश क्षीरसागर यांना ‘पद्मश्री डॉ. अरविंद गुप्ता विज्ञान प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. रामकृष्ण (भाऊ) माने आणि डॉ. सुभाष सुराणा यांना ‘श्रद्धेय वसंतराव दिवेकर जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

तर ‘श्रद्धेय वसंतराव दिवेकर स्मृती पुरस्कार’ दीपक (आबा) देशमुख, महेंद्र पाटील, सुहास गलांडे, श्री दत्त देवस्थान समिती कोंढारचिंचोली, शिवाजीराव बंडगर, डॉ. बाबुराव हिरडे, नानासाहेब साळुंके, वैभव पोळ, किरण डोके-पाटील, डॉ. प्रमोद कांबळे, विक्रमदादा आल्हाट, डॉ. सुनिता दोशी, चित्रकार निवास कन्हेरे, पत्रकार गजेंद्र पोळ, हर्षाली नाईकनवरे, सोनाली नितीन तकिक पाटील आणि राजेंद्र रणसिंग यांना प्रदान करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती; सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. गणेश करे-पाटील यांनी पुरस्कारार्थींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विधायक कार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अर्जुनराव लावंड यांनी भूषविले.

यावेळी लक्ष्मणराव साळुंके, प्रा. बाळकृष्ण लावंड, प्रा. कल्याणराव साळुंके, लष्कर गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. रामकृष्ण माने, डॉ. सुभाष सुराणा, डॉ.ॲड.बाबुराव हिरडे, सोनाली तकिक आणि अक्रूर शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. स्नेहमेळाव्याला गीत, संगीत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड मिळाल्याने वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. जयेश पवार, भाऊसाहेब माने, भिवा वाघमोडे, संदीप मोटे आदींनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.विष्णू शिंदे यांनी केले.

समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेणे, त्यांना सन्मानित करणे आणि त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा देणे, हाच या स्नेहमेळाव्याचा मुख्य उद्देश ठरला. राहीबाईंच्या निसर्गसंवर्धनाच्या विचारांसह समाजरत्नांच्या कार्याचा गौरव करणारा हा सोहळा करमाळ्यात माणुसकी, कृतज्ञता आणि सेवाभावाचा जागर ठरला.

error: Content is protected !!