कुंभेजच्या कलावंताची राजधानी दिल्लीत रंगपंचमी!

चित्रकार निवास कन्हेरे यांचे ‘Prismatic Resonances’ प्रदर्शन २३ नोव्हेंबरपासून; त्रिवेणी आर्ट गॅलरीत कलाकृतींचा अनोखा आविष्कार

करमाळा : करमाळा तालुक्यातील कुंभेज गावच्या मातीत रुजलेली कलाप्रतिभा आता देशाच्या राजधानीत आपल्या रंगांची जादू दाखविण्यास सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चित्रकार निवास कन्हेरे यांच्या ‘Prismatic Resonances’ या विशेष चित्रप्रदर्शनाचे आयोजन २३ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नवी दिल्ली येथील प्रतिष्ठित त्रिवेणी आर्ट गॅलरीमध्ये करण्यात आले आहे. त्यांच्या या कलात्मक यशामुळे करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ग्रामीण जीवनातील अनुभव, मानवी भावभावना आणि मानवी संवेदनांचे विविध पैलू आपल्या चित्रांतून प्रभावीपणे मांडणारे कन्हेरे यांनी रंगांच्या प्रयोगशीलतेतून स्वतःची वेगळी कलाभाषा निर्माण केली आहे. त्यांच्या कलाकृतींनी अमेरिका, दुबईसह देश-विदेशातील कलारसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

यापूर्वी मुंबईतील प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले होते. यावेळी प्रा. डॉ. गणेश करे-पाटील, कन्हेरे यांचे शिक्षक प्रा. कल्याणराव साळुंके आणि पत्रकार गजेंद्र पोळ उपस्थित होते.

ग्रामीण प्रतिभेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

निवास कन्हेरे यांच्या या यशाबद्दल यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. गणेश करे-पाटील यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “मातीत रुजलेल्या प्रतिभेला आभाळ गवसते, तेव्हा तो केवळ कलाकाराचा गौरव राहत नाही, तर त्या मातीच्या सर्जनशील सामर्थ्याचाही सन्मान ठरतो. निवास कन्हेरे यांचा कलाप्रवास ग्रामीण भागातील नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.”

कुंभेजसारख्या छोट्याशा गावातून सुरू झालेला निवास कन्हेरे यांचा कलाप्रवास आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. जिद्द, सातत्य, कल्पकता आणि कलेवरील निष्ठेच्या जोरावर त्यांनी मिळवलेले हे यश करमाळा तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे. यानिमित्ताने यशकल्याणी संस्थेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील कलाप्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!