ग्रामपंचायतींकडील ५ टक्के दिव्यांग निधी न वाटप केल्यास कारवाईची मागणी
– प्रहार संघटनेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

करमाळा : करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी सन २०२४–२५ मधील ५ टक्के दिव्यांग निधी दिव्यांग लाभार्थ्यांना वितरित न केल्यास संबंधित ग्रामसेवक, सरपंच यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांनी केली आहे.

या संदर्भात पंचायत समिती करमाळा येथील गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, करमाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायती व पंचायत समितीमार्फत दिव्यांगांसाठी राखीव असलेला ५ टक्के निधी अद्याप वितरित करण्यात आलेला नाही. काही ग्रामसेवकांकडून हा निधी इतरत्र खर्च झाल्याची खोटी माहिती दिली जात असून, काही ठिकाणी अल्प प्रमाणात निधी वाटप केले जात आहे, तर काही गावांमध्ये निधीच वितरित केला जात नाही.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, २६ जानेवारी रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत दिव्यांग लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात यावा आणि त्याच वेळी ५ टक्के निधीचे पूर्ण वाटप करण्यात यावे. सर्व ग्रामसेवकांना याबाबत स्पष्ट सूचना देऊन दिव्यांगांना न्याय मिळवून द्यावा.

गावपातळीवरील राजकीय दबावाखाली काम करणारे तसेच दिव्यांग निधीच्या वाटपात दुर्लक्ष करणारे ग्रामसेवक, सरपंच यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा प्रहार संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी प्रहार तालुका उपाध्यक्ष पप्पू ढवळे, दिव्यांग संघटना अध्यक्ष बिभीषण काळे, सामाजिक नेते मानसिंग खंडागळे यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.

