श्री शाहू शिक्षक आघाडी, कागल यांच्याकडून करमाळा तालुक्यातील १५० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट

करमाळा:“आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्री शाहू शिक्षक आघाडी, कागल (ता. कागल, जि. कोल्हापूर) यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.
सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे करमाळा तालुक्यातील अनेक भागांना पूरस्थितीचा फटका बसला होता, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला. ही परिस्थिती लक्षात घेऊन श्री शाहू शिक्षक आघाडीने पुढाकार घेत थेट विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवली.

या उपक्रमांतर्गत करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या सहा केंद्रांतील सुमारे १५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबेवाडी, दिलमेश्वर, लावंडवस्ती, निळवस्ती, फरतडे वस्ती तसेच तळेकर वस्ती क्रमांक २ येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. वह्या, पेन, पेन्सिल व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य असलेल्या या किटमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पुन्हा गती मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. शैक्षणिक साहित्य मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. भविष्यातही तालुक्यातील शाळा, विद्यार्थी किंवा शिक्षकांना कोणत्याही अडचणी आल्यास मदतीसाठी सदैव पुढे राहू, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास बाळासाहेब निंबाळकर (माजी चेअरमन व विद्यमान संचालक, कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक), सुनील पाटील (माजी चेअरमन, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी कोल्हापूर व जिल्हा सरचिटणीस, शिक्षक संघ – थोरात गट), के. डी. पाटील, संजय दाभाडे, जितेंद्र कुंभार (चेअरमन, सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक पतसंस्था) उपस्थित होते.

तसेच सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक प्रदीप बुधाळे, बाळासाहेब तांबेकर, बाळू खामकर, पी. आर. पाटील, हरिश्चंद्र साळुंखे, ए. एल. कांबळे, विठ्ठल पाटील यांच्यासह पंचायत समिती करमाळाचे शिक्षण विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले, केंद्रप्रमुख संजय मुंढे, सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा नेते तात्यासाहेब जाधव, करमाळा तालुका जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष अरुण चौगुले, करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सचिव अजित कणसे, बलभीम बनसोडे, नितीन काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री शाहू शिक्षक आघाडी कागल यांच्या या उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला असून, अशा सामाजिक उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

