स्वच्छ व सुव्यवस्थित करमाळ्याचा निर्धार : नूतन नगराध्यक्षा सौ.मोहिनी सावंत

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ, सुंदर व सुव्यवस्थित शहर उभारण्याचा निर्धार नूतन नगराध्यक्षा सौ.मोहिनी संजय सावंत यांनी व्यक्त केला. सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन पारदर्शक, लोकाभिमुख व विकासाभिमुख कारभार केला जाईल, असे त्यांनी पदग्रहण सोहळ्यात स्पष्ट केले.

७ जानेवारी रोजी करमाळा नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जनतेने करमाळा शहर विकास आघाडीवर टाकलेला विश्वास विकासकामांच्या माध्यमातून निश्चितच सार्थ ठरवला जाईल, अशी ग्वाही यावेळी सौ.सावंत यांनी दिली. निवडणुकीत भरभरून मते देऊन निवडून दिल्याबद्दल त्यांनी करमाळा शहरातील नागरिकांचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत व त्यांचे पती संजय भगवान सावंत यांचा नगरपालिकेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी करमाळा शहर विकास आघाडीचे नगरसेवक रवी जाधव, विक्रमसिंह परदेशी, सौ. चैताली सुनील सावंत, सौ. ज्योत्स्ना लुणिया, सौ. जबीन मुलाणी, सौ. पूजा इंदलकर, संदीप कांबळे व संजय सावंत यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष कक्षामध्ये कै. सुभाष आण्णा सावंत व कै. डी. के. सावंत यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, करमाळा शहर विकास आघाडीने मोठ्या व प्रस्थापित पक्षांविरोधात थेट लढत देऊन निवडणूक लढवली. जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास हा सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे करून निश्चितच सार्थ ठरवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत यांचे पती संजय भगवान सावंत यांनी जनतेचे आभार मानताना सांगितले की, रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, नालेसफाई यांसह शहराच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन एकसंघपणे करमाळा शहराच्या विकासासाठी काम केले जाईल.
आदिनाथ साखर कारखान्याचे संचालक ॲड. राहुल सावंत यांनी नूतन नगराध्यक्षा व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हेच खरे आव्हान असून, नव्या नेतृत्वाखाली करमाळा शहराचा चेहरामोहरा नक्कीच बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पदग्रहणानिमित्त करमाळा शहरातून मिरवणूक काढण्यात आली. शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष व नगरसेवकांनी नगरपालिकेत जाऊन अधिकृतपणे पदग्रहण केले.

या कार्यक्रमास भाजपचे नगरसेवक दीपक चव्हाण, सचिन घोलप, अतुल फंड, सौ. स्वाती महादेव फंड, नगरसेवक प्रतिनिधी विजय घोलप, सचिन गायकवाड, रामभाऊ ढाणे यांनी नूतन नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत व संजय सावंत यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. तसेच माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, अजितसिंह परदेशी, झनकसिंह परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रवीण कटारिया, सुखदेव लष्कर, लालाभाई कुरेशी, गणेश झोळे, मनोज गोडसे, शैलेश खडके, सुनील लुणिया, पिल्लू इंदलकर, अभय महाजन, कदीर शेख, महेश मोरे, विनोद महानवर, प्रियंका गायकवाड, जयश्रीताई मुसळे, मीरा शेंडे, पुष्पा शिंदे, अल्लाउद्दीन शेख, बापू उबाळे, पांडुरंग घोगरे, पप्पू सूर्यवंशी, भूषण खुळे, अमोल परदेशी, हुमरान मुलाणी, जितेश कांबळे, बापू मोरे, देवा लोंढे, रविंद्र कांबळे, जमीर सय्यद, सुनील विटकर, राजकुमार जगताप, बाळासाहेब कुंभार, सावंत बंधू व त्यांचे कुटुंबीय, करमाळा शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच सावंत गटावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतन नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली करमाळा नगरपालिकेच्या कारभारात नवा अध्याय सुरू झाला असून, शहराच्या विकासाबाबत नागरिकांमध्ये मोठी अपेक्षा व उत्साह निर्माण झाला आहे.
