स्वीकृत नगरसेवकासाठी जोरदार हालचाली - कुणाला लाॅटरी लागणार शहरवासीयांना उत्सुकता -

स्वीकृत नगरसेवकासाठी जोरदार हालचाली – कुणाला लाॅटरी लागणार शहरवासीयांना उत्सुकता

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा, ता.८: नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा काल (ता.७)उत्साहात पार पडला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सज्ज झाले असून, गुलाबपुष्पांनी नगरपरिषद इमारत फुलून सजवली होती. या सोहळ्यानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या दोन जागेसाठी जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू आहे.


नगरपरिषदेत सध्या सावंत गट – ८, भाजप – ७ तर शिवसेना (जगताप गट) – ५ असे बलाबल आहे. या गणितानुसार सावंत गटाला एक व भाजपला एक असे दोन स्वीकृत नगरसेवक निवडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी गटनेते, पक्षश्रेष्ठी व वरिष्ठ नेत्यांकडे आपापली फिल्डिंग लावली असून, कुणाचे पारडे जड होणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


सावंत गटाकडून शिवसेनेचे तालुका प्रमुख सुधाकर काका लावंड यांचे चिरंजीव सिध्देश्वर लावंड तसेच ब्राह्मण युवक संघटनेचे माजी अध्यक्ष विजय देशपांडे यांची नावे आघाडीवर आहेत. तर भाजपकडून कन्हैयालाल देवी, सामाजिक कार्यकर्ते व बागल गटाचे विश्वासू सहकारी विजय लावंड, तसेच वकील संघ व लोकमान्य टिळक मंडळाचे माजी अध्यक्ष ॲड. शिरीषकुमार लोणकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. लोणकर हे माजी आमदार विलासराव घुमरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.


दरम्यान, शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष सिकंदर जाधव यांना उमेदवारी न मिळाल्याने तेही स्वीकृत नगरसेवक पदासाठी आग्रही असून, त्यामुळे समीकरणे आणखी गुंतागुंतीची होत चालली आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने मोर्चेबांधणी, भेटीगाठी आणि लॉबिंग करत असल्याचे चित्र आहे. जर हा तिढा सुटला नाही, तर अखेरचा निर्णय मार्गदर्शक विलासराव घुमरे यांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी पत्नी जयश्रीताई घुमरे यांचे नाव आघाडीवर असतानाही पक्षहितासाठी त्यांनी ऐनवेळी माघार घेतली होती. त्या त्यागाची उतराई म्हणून सौ. जयश्रीताई घुमरे यांचे नाव स्वीकृत नगरसेवक म्हणून पुढे येणार का? अशीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

यामुळे करमाळ्याचे राजकारण तापले असून, स्वीकृत नगरसेवक म्हणून अखेर कुणाचे नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!