२५ वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर विराम; कुकडी कालव्याच्या दुरुस्तीतून मोरवडच्या शेतकऱ्यांना पाणी; गणेश चिवटे यांचा पुढाकार

करमाळा(प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील मोरवड येथे गेल्या अनेक दशकांपासून कुकडी कालव्याचे पाणी हे केवळ स्वप्न ठरले होते. पाण्याअभावी शेती ओसाड, उत्पन्न मर्यादित आणि शेतकऱ्यांचे जीवन संघर्षमय बनले होते. मात्र तब्बल २५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मोरवडच्या शेतकऱ्यांच्या शेतात कुकडीचे पाणी पोहोचले असून, या घटनेने गावाच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आहे.

दीर्घकाळ नादुरुस्त अवस्थेत असलेल्या कुकडी कालव्याची स्वच्छता व दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात गणेश चिवटे यांचा निर्णायक व मोलाचा सहभाग लाभला आहे, मोरवड परिसरातून जाणारा कुकडी कालवा गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत होता. कालव्यामध्ये काटेरी झुडपे, मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला होता, तर काही ठिकाणी घनकचऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह पूर्णतः थांबला होता. ठिकठिकाणी कालव्याला गळती लागल्याने उपलब्ध पाणी पुढील भागात पोहोचत नव्हते. परिणामी कालव्याच्या शेवटच्या टप्प्यातील सुमारे 50 ते 60 शेतकरी पाण्यापासून कायम वंचित राहिले.

ही गंभीर समस्या शेतकऱ्यांनी गणेश चिवटे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत त्यांनी कोणतीही प्रशासकीय दिरंगाई न करता तातडीने पुढाकार घेतला. स्वतःच्या खर्चातून आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्याने सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या कालव्याची मोठ्या प्रमाणावर स्वच्छता व दुरुस्तीचे काम केले , जेसीबीच्या साहाय्याने गाळ काढण्यात आला, झुडपे हटवण्यात आली आणि गळती असलेल्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली.

या कामामुळे अनेक वर्षांपासून अडलेले पाणी सुरळीतपणे वाहू लागले. कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचताच अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. पाण्याअभावी रखडलेली पेरणी, बागायती शेतीची स्वप्ने आणि शेतीतील गुंतवणूक पुन्हा सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून मोरवड गावात जलपूजन करण्यात आले. शेतकऱ्यांनी एकत्र येत आनंद व्यक्त केला आणि गणेश चिवटे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला “हा केवळ कालव्याचा प्रश्न नव्हता, तर आमच्या पिढ्यान्पिढ्यांच्या भवितव्याचा प्रश्न होता,” अशा भावना अनेक शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमास भगवानगिरी गोसावी, ज्येष्ठ नेते रामभाऊ नाळे, धर्मराज नाळे, दादासाहेब काळे, बजरंग मोहळकर, रोहीदास नाळे, महादेव मेहेर, बापू नाळे, भिवा नाळे, महेंद्र नाळे, गहिनीनाथ नाळे, दिलीप काळे, राजेंद्र नाळे, राजेंद्र मोहोळकर, रेवणनाथ मोहोळकर, बाळू दिवटे, महादेव नाळे, लालासाहेब नाळे, विकास मोहोळकर, संदीप आदलिंगे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“गेल्या २५ वर्षांपासून आम्हाला या कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा होती. अनेकदा प्रयत्न करूनही काहीच घडत नव्हते. गणेश चिवटे यांनी आमची व्यथा समजून घेतली आणि तातडीने कालवा दुरुस्त केला. आज आमच्या शेतात पाणी आले आहे. राजेंद्र मोहोळकर, शेतकरी, मोरवड

