पिता झाला दैत्य! – दोन्ही मुलांना दिले विहिरीत ढकलून!

करमाळा(ता.१०): जेव्हा जन्मदाता पिताच दैत्य होतो, तेव्हा काय घडते, याची प्रचिती केत्तूर येथील नागरीकांना आज आली आहे. केत्तूर रेल्वे स्टेशन येथील सुहास जाधव याने स्वतःच्या आठ वर्षाच्या जुळ्या मुलांना हिंगणी हद्दीतील विहिरीत शनिवारी (ता.१०) ढकलून देवून त्यांचा जीव घेतला आहे. विशेष म्हणजे सुहास जाधव हा वीज वितरण कंपनीत ऑपरेटर म्हणून करमाळा तालुक्यातील झरे येथे काम करतो.

जाधव यास शिवांश व श्रेया अशी जुळी दोन आठ वर्षाची मुले होती. या दोन्ही मुलाला आणि मुलीला त्यांने विहिरीत ढकलून दिले. या दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्यानंतर जाधव हा बार्शी येथे पळून गेला होता. पोलीसांनी त्याचा शोध घेवून त्याला बार्शीतून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने विष प्राशन केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला बार्शी येथील प्राथमिक उपचारा नंतर सोलापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

घटना घडल्याची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा तसेच पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी घटनास्थळी भेट देवून सर्व माहिती घेतली आहे. यात पोलीसांनी पित्याविरुध्द गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.


