शाहूनगर येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१३: शहरातील शाहूनगर येथे १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा म्हस्के यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बालसंस्कार वर्गातील विद्यार्थी तसेच माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात आयोजिका सौ. रेशमा जाधव यांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या संस्कारातून बालशिवबा कसा घडला, जिजाऊंचा संघर्षमय जीवनप्रवास आणि त्या संस्कारांतून छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले. याबरोबरच एक आदर्श माता व आदर्श पुत्र कसा असावा, तसेच आजच्या परिस्थितीत मुलांना कोणते संस्कार द्यावेत याविषयी त्यांनी प्रभावी प्रबोधन केले.
यावेळी ‘स्वराली जाधव’ हिने राष्ट्रमाता जिजाऊंवर भाषण केले. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त मुलांना त्यांच्या जीवनचरित्राची माहिती देण्यात आली. ‘सानवी राठोड’ हिने इंग्रजी भाषेतून स्वामी विवेकानंद यांच्याविषयी प्रभावी भाषण सादर केले.



स.पो.नि.म्हस्के यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व शहाजीराजे यांच्या कार्याबद्दल अतिशय सुंदर पद्धतीने माहिती सांगितली तसेच पालकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. नियमित बालसंस्कार वर्गात सहभागी होणाऱ्या चिमुकल्या बालकांनी हनुमान चालीसा, गणपती स्तोत्र व मारुती स्तोत्राचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
हा कार्यक्रम प्रेरणादायी व संस्कारक्षम ठरला.
