यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात
राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१३: राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून १२ जानेवारी ला येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ जयंती, राष्ट्रीय युवा दिन, अमली पदार्थमुक्त भारतासाठी जनजागृती, निरोगी जीवनशैली व कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एस.एम. घुगे, हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून IPS अधिकारी कु. अंजना कृष्णा या होत्या.

यावेळी बोलताना न्यायाधीश घुगे म्हणाले, की… “सुदृढ, निरोगी व मूल्याधिष्ठित युवक हीच देशाची खरी शक्ती आहे. एका वेळी एकच काम करा आणि तुमचा संपूर्ण आत्मा त्यात ओता. आयुष्यात जोखीम घ्या; जिंकलात तर नेतृत्व कराल, हरलात तरी मार्गदर्शन कराल,” असे मौलिक विचार त्यांनी मांडले.
IPS अधिकारी कु. अंजना कृष्णा यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार प्रभावीपणे मांडले. “तुम्ही आयुष्यात जे ठरवाल ते नक्की साध्य करू शकता. कठीण आव्हाने स्वीकारा. यश मिळाल्यास नम्र राहा आणि अपयश आले तरी त्यातून शिकून अधिक जोमाने पुढे जा,” असा मोलाचा संदेश दिला.
यश कल्याणीचे अध्यक्ष मा.गणेश करे पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले.

प्रास्ताविक व मार्गदर्शन करताना प्र. प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने यांनी राजमाता जिजाऊ साहेबांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, आजचा स्वतंत्र, सक्षम व प्रगत भारत घडण्यामागे राजमाता जिजाऊ साहेबांचे मोठे योगदान आहे. बाल शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी स्वराज्याची संकल्पना रुजवून, रयतेविषयी आपुलकी, महिलांचा सन्मान व न्यायप्रियता हे संस्कार त्यांनी शिवरायांवर केले. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज जगातील इतर राजांपेक्षा वेगळे ठरले.राष्ट्रीय युवा दिनानिमित्त बोलताना डॉ. माने म्हणाले, की देशाची खरी ताकद युवकांमध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांनी दाखवलेला आदर्श मार्ग अंगीकारून राष्ट्रनिर्मितीत सहभाग घ्यावा.

या कार्यक्रमात अॅड. दिवाण, अॅड. यादव देशमुख मॅडम व अॅड. मंजरतकर यांनी महिला हक्क, ग्राहक हक्क, अमली पदार्थविरोधी कायदे व विविध सामाजिक कायद्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी न्यायाधीश श्रीमती एस. पी. कुलकर्णी या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. ए. टी. करपे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

