रोटरी क्लब ऑफ कळंबोलीकडून रावगाव नेहरू विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना डिजिटल लर्निंग कूपन वाटप

करमाळा: पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव येथील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब ऑफ कळंबोली यांच्यावतीने तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते गोरख बापू रासकर यांच्या सहकार्यामुळे प्रत्येकी १६०० रुपये किमतीचे इयत्ता दहावीच्या अभ्यासासाठी उपयुक्त कूपन वाटप करण्यात आले.


या कूपनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या विविध विषयांचा सखोल अभ्यास, स्वाध्याय, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, कृतिपुस्तिका तसेच इतर शैक्षणिक घटकांचा वापर करता येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घरबसल्या अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस चालना देण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

या कार्यक्रमासाठी गोरख बापू रासकर यांच्या वतीने त्यांचे स्नेही सखाराम आबा पवार, गावचे सरपंच संदीप शेळके, सामाजिक कार्यकर्ते भास्करभाऊ पवार, तसेच जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांची उपस्थिती लाभली. यावेळी प्रशांत शिंदे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासातील सातत्य, शिस्त, नियोजन आणि उपलब्ध साधनांचा योग्य वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी रोटरी क्लब ऑफ कळंबोली तसेच गोरख बापू रासकर यांनी दिलेल्या या मोलाच्या योगदानाबद्दल शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने अभ्यास करता येईल आणि त्यांच्या यशाच्या वाटचालीला निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विजय कोळेकर व्यक्त केला.

