श्री ऊत्तरेश्वर देवस्थानात पानांच्या मखराची व ११ किलो पेढ्यांची आकर्षक आरास

केम(संजय जाधव) : मकरसंक्रांतीनिमित्त सालाबादप्रमाणे केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थानात पानांच्या मखराची भव्य व आकर्षक आरास करण्यात आली.

या आरासेसाठी भक्त बंडू दौंड यांनी चार कवळी नागवेलीची पाने उपलब्ध करून दिली. मंदिराचे पुजारी कृष्णा गुरव, तात्या गुरव व शंकर देवकर यांनी ही आरास साकारली.

मंदिरातील नंदीसमोर असलेल्या शिवलिंगाची तिळगुळ वापरून विशेष सजावट करण्यात आली होती. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने वानवसा घेण्यासाठी आलेल्या महिला भाविकांना शिवलिंगाचे मनोहर रूप पाहून विशेष आनंद झाला. भाविकांनी या आरासेचे कौतुक करीत समाधान व्यक्त केले.

याशिवाय सोमवारी शिवलिंगाची ११ किलो पेढ्यांची आरास करण्यात आली होती. या विशेष पूजेचेही भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात आले.
श्री ऊत्तरेश्वर देवस्थानात दर सोमवारी तसेच विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने शिवलिंगाची वेगवेगळ्या स्वरूपात आकर्षक आरास केली जाते. ही आरास मंदिराचे पुजारी कृष्णा गुरव व तात्या गुरव सातत्याने करीत असतात. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे मन प्रसन्न होते, अशी भावना मठाधिपती जयंतगिरी महाराज यांनी व्यक्त केली.



