एस.टी. कर्मचाऱ्यांनी उत्साहात कार्यरत रहावे-डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे

करमाळा(ता.१९): समाजाला सुरक्षित व सुदृढ सेवा देणारी एसटी आणि तिचे कर्मचारी जर स्वतःचे मानसिक स्वास्थ्य जपून उत्साहाने कार्यरत राहिले, तर दैनंदिन कामकाज अधिक शिस्तबद्ध व परिपूर्ण होईल. त्यामुळे एसटी फायद्यात येऊन नागरिकही समाधानी राहतील, असे प्रतिपादन ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष डॉ. ॲड. बाबुराव हिरडे यांनी केले.

इंधन बचत साप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगारप्रमुख वीरेंद्र होनराव होते. व्यासपीठावर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक एस. टी. चव्हाण, वाहतूक निरीक्षक पंकज जाधव यांच्यासह एसटीतील चालक, वाहक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲड. हिरडे पुढे म्हणाले की, कोणतेही काम कमी प्रतीचे आहे असा विचार न करता ते उत्साहाने व मनापासून केले, तर त्या कामाला नक्कीच यश मिळते. कामातील प्रेम व सकारात्मक दृष्टीकोनामुळे दैनंदिन उत्साह टिकून राहतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कामात जाणीवपूर्वक आपली निष्ठा आणि भक्ती व्यक्त करावी व चांगली निर्मिती साधण्याचा प्रयत्न करावा. नियमित कामापेक्षाही अधिक चांगली सेवा कशी देता येईल आणि प्रवाशांना अधिक समाधान कसे मिळेल, याचा प्रत्येकाने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक बलभीम दैन यांनी केले, तर आभार सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक एस. टी. चव्हाण यांनी मानले.

