विद्यार्थ्यांनी स्वप्न आखून वेळेत ती साकारावीत; तरच भविष्य उज्ज्वल — डॉ. ॲड. बाबुराव हिरडे

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१९: विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याची स्वप्न ठरवून ती योग्य वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, तरच त्यांचे भविष्य सुखकर आणि यशस्वी होऊ शकते, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. ॲड. बाबुराव हिरडे यांनी केले.
येथील प्रतापसिंह मोहिते पाटील विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने मोरवड येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातील प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. व्ही. देशमुख होते. यावेळी माजी मुख्याध्यापक एन.आर. भुजबळ , रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.सोमनाथ जाधव, प्रा. अमोल गायकवाड, प्रा. महादेव वाघमारे, प्रा. डॉ. सौ. स्वाती पाटील, प्रा. डॉ. अरुण चोपडे, प्रा. डॉ. ज्ञानदेव भोसले, उद्धव नाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. ॲड. हिरडे पुढे म्हणाले की, ज्या वयात ज्या गोष्टी करणे अपेक्षित असते, त्या त्या टप्प्यावर केल्या तरच भविष्य घडते. योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यास वेळ हातातून निसटून जाते आणि स्वप्न साकार होण्याआधीच दूर जाते. आजवर घडलेले सर्व महापुरुष हे वेळेत निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केल्यामुळेच महान ठरले आहेत. आपण महान झालो नाही तरी चालेल, मात्र वैयक्तिक जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला नेमके काय व्हायचे आहे हे निश्चित करून त्याचा प्रामाणिक पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी शिंदे यांनी केले. प्रास्ताविक कु. कीर्ती जाधव यांनी मांडले, तर आभार कु. ऋतुजा क्षिरसागर यांनी मानले

