मराठी भाषा संतांची, पंतांची व कष्टकऱ्यांचीच; म्हणूनच ती अभिजात आहे– प्रा. डॉ. संजय चौधरी -

मराठी भाषा संतांची, पंतांची व कष्टकऱ्यांचीच; म्हणूनच ती अभिजात आहे– प्रा. डॉ. संजय चौधरी

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२०: मराठी भाषा ही केवळ संवादाची भाषा नसून ती संतांची, पंतांची, कष्टकऱ्यांची व सामान्य जनतेची भाषा आहे. समाजाला विचार, संस्कार आणि सर्वार्थाने परिपूर्ण करण्याचे महान कार्य मराठी भाषेने केले आहे.  त्यामुळेच मराठी ही अभिजात भाषा आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. संजय चौधरी यांनी केले.

येथील न्यायालयात तालुका विधी सेवा समिती करमाळा व करमाळा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अभिजात मराठी भाषा दिन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. पी. कुलकर्णी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष वरिष्ठ न्यायाधीश संजय घुगे, न्यायाधीश अमित शर्मा तसेच वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राम नीळ उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा. डॉ. चौधरी म्हणाले की, मराठी भाषेने समाजाला केवळ शब्दच दिले नाहीत, तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत, बाहिणाबाईंपासून विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या शाहिरांपर्यंत या भाषेने सर्वांना समृद्ध केले आहे. पोवाडा, भारुड, लावणी, अभंग अशा विविध साहित्यप्रकारांतून मराठीने सामान्य जनतेला भरभरून दिले आहे. ही भाषा कष्टकऱ्यांची आहे, विद्वानांची आहे, न्यायालयांची आहे आणि विशेष म्हणजे आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वांनी सर्वांगीण प्रयत्न केले पाहिजेत व या भाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांनी सांगितले की, अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त झालेला हा सन्मान अत्यंत परिपूर्ण असून, मराठी भाषेची समाजातील भूमिका प्रा. डॉ. संजय चौधरी यांनी अत्यंत सुरेख व प्रभावी शब्दांत मांडली. हे विचार आपल्या सर्वांसाठी अनमोल आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक एस.एल.जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपीक राम खराडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!