बालविवाह रोखण्यासाठी ‘वसमत पॅटर्न’ राज्यभर राबवावा – झिंजाडे यांची शासनाकडे मागणी

करमाळा(दि. 23 जानेवारी) : वसमत (जिल्हा हिंगोली) येथील दहावीतील पंधरा वर्षांच्या मुलीने मुख्याध्यापकांकडे धाव घेऊन स्वतःचा होऊ घातलेला बालविवाह रोखल्याची घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरली असून, अशा प्रकारे मुला–मुलींनी स्वतः पुढाकार घेणे ही आज काळाची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी या संदर्भात महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग व महिला व बालकल्याण मंत्रालयाकडे निवेदन देत ‘वसमत पॅटर्न’ राज्यभर राबविण्याची मागणी केली आहे.

मुलींमध्ये प्रबोधन व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शासनाने हा पॅटर्न अधिकृतपणे जाहीर करावा, तसेच प्रत्येक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना तो वाचून दाखवावा, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व प्रत्येक ग्रामसभेत या उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ‘बालविवाहमुक्त भारत’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास झिंजाडे यांनी व्यक्त केला आहे.
काय आहे घटना?
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील एका गावच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीचे लग्न तिच्या पालकांनी फेब्रुवारी महिन्यात निश्चित केले होते. मुलगी अल्पवयीन असताना आणि तिची शिकण्याची जिद्द असतानाही, कुटुंबीयांनी तिच्या मनाविरुद्ध २५ वर्षाच्या मुलाबरोबर तिचे लग्न लावून देण्याचा घाट घातला होता. मात्र, या अन्यायाविरुद्ध गप्प न बसता, त्या मुलीने धाडस दाखवले व शाळेच्या मुख्याध्यापकांना गाठून आपली कैफियत मांडली.
विद्यार्थिनीच्या विनंती अर्जाची गांभीर्याने दखल घेत मुख्याध्यापकांनी तत्काळ पावले उचलली. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून ग्रामविकास अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि लग्न रोखण्यासाठी लेखी पत्रही देण्यात आले. या पत्राची दखल घेऊन ग्रामपंचायत स्तरावर बालविवाह रोखण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू झाली.

पालकांचे समुपदेशन सुरू
बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार 18 वर्षांखालील मुलीचे लग्न लावणे हा गंभीर गुन्हा आहे. प्रशासनाकडून आता संबंधित मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. बालविवाहाचे दुष्परिणाम आणि मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व पालकांना पटवून देऊन हा विवाह रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रशासन या धाडसी मुलीचे शिक्षण खंडित होऊ देणार नाही आणि हा बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.

