तरुणांच्या देशाचे भवितव्यासाठी शाळांतूनच उत्तम घडण आवश्यक – उपमुख्यकार्यकारी अधिकारी मनोज राऊत

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२४:“आजचा भारत हा तरुणांचा देश आहे; मात्र दुर्दैवाने याच देशात तरुणांची ससेहोलपट होत आहे. त्यांच्या समस्या वेळीच सोडवल्या नाहीत, तर या देशाची युवा पिढी नेमकी कुठे जाईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक शाळेतून अतिशय दर्जेदार आणि मूल्याधिष्ठित शिक्षण दिले पाहिजे, तरच देशाचे भवितव्य सुरक्षित राहील,” असे परखड मत उपमुख्यकार्यकारी अधिकारी मनोज राऊत यांनी व्यक्त केले.

साडे येथे शहीद मेजर अमोल निलंगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ व यश कल्याणी सेवाभावी संस्था, पुणे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल केदार भिडे, कर्नल कुलदीप करपे डॉ. प्रचिती पुंडे, डॉ.ॲड. बाबुराव हिरडे, आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अक्रूर शिंदे, सोलापूर जिल्हा इंग्रजी लँग्वेज असोसिएशनचे अध्यक्ष बाळकृष्ण लावंड उपस्थित होते. तसेच गुजरात येथील वरीष्ठ अधिकारी विष्णू अवचर हे विशेष अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये आदर्श पोलीस निरीक्षक म्हणून रणजीत माने, आदर्श तहसीलदार म्हणून शिल्पा ठोकडे, वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ.प्रचिती पुंडे, ग्रामीण भागात सेवा देणारी व्यक्ती म्हणून गुलाबराव देवकते, प्रगतशील बागायतदार म्हणून संभाजी भोसले, प्रसिद्ध पक्षी अभ्यासक म्हणून कल्याणराव साळुंखे, आदर्श कलाशिक्षक म्हणून सचिन शिंदे, तर आदर्श सैनिक म्हणून किरणजी ढेरे यांचा सन्मान करण्यात आला.

यासोबतच पीएम श्री साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा क्रमांक १, नगरपरिषद करमाळा या शाळेला आदर्श शाळा म्हणून विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रकला व निबंध स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, बक्षिसे व प्रमाणपत्रे यश कल्याणी संस्थेच्या वतीने देण्यात आली.
पुढे बोलताना श्री. राऊत म्हणाले, “आज देशात युवकांची संख्या मोठी असली तरी त्यांना योग्य दिशा मिळत नाही. वेळ असूनही काय करावे हे सुचत नाही. परिणामी दररोज दोन जीबी डेटा उडवण्यात वेळ जातो. घरात किंमत नाही, समाजात किंमत नाही;हाती काही नसल्याने लग्न होत नाही. यातच हे तरुण भरकटत जातात, त्यांची फक्त निवडणुकीच्या काळातच आठवण होते. अशा तरुणांना घडवायचे असेल, तर शिक्षकांनी शाळेतूनच विशेष पद्धतीने शिक्षण देत त्यांना संस्कारित, सक्षम आणि स्वयंपूर्ण बनवले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात डॉ.प्रचिती पुंडे, बाळकृष्ण लावंड,डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे विष्णू अवचर, कर्नल केदार भिडे, कर्नल कुलदीप करपे आदींची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांनी केले, तर विशेष सूत्रसंचालन सचिन गाडेकर यांनी केले. आभार अध्यक्ष अक्रूर शिंदे यांनी व्यक्त केले उपस्थितांचे स्वागत अरविंद निलंगे व सौ अनुजा निलंगे यांनी केले. यावेळी डॉ. प्रचिती पुंडे यांनी शहिद मेजर अमोल निलंगे स्मारक समितीला व्यासपीठ भेट दिले. यावेळी. गोकुळ पाटील, देविदास ताकमोगे, पोपट शेलार, सरपंच अण्णा आडेकर, नानासाहेब ढवळे सर, आजी माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, शहीद कुटुंबीय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

