संगोबा–घारगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; शासनाने रस्ता तातडीने दुरुस्त करावा – माजी सरपंच सरवदे

करमाळा : करमाळा तालुक्यातील संगोबा–घारगाव रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या ऊसतोड हंगाम सुरू झाल्याने या मार्गावरून ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असून त्यामुळे रस्त्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे.

सातत्याने सुरू असलेल्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे पडले असून दिवसेंदिवस त्यांचा आकार व संख्या वाढत चालली आहे. या खड्ड्यांमुळे प्रवास करणे अत्यंत त्रासदायक बनले आहे. खड्ड्यांतून जाताना ऊसाने भरलेल्या ट्रॉलीतील मोळ्या रस्त्यावर पडणे तसेच ट्रॉली उलटण्याचे प्रकारही वाढले असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.


रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून तातडीने रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी माजी सरपंच लक्ष्मी सरवदे यांनी केली आहे. संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन संगोबा ते घारगाव रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.


