प्रहारच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केम–पांडे गटात बच्चू कडूंच्या सभांचे आयोजन -

प्रहारच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केम–पांडे गटात बच्चू कडूंच्या सभांचे आयोजन

0

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यात होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या केम व पांडे गटात भव्य जाहीर प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभांमधून सत्ताधाऱ्यांविरोधात थेट आक्रमक भूमिका घेतली जाणार असल्याने तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाने केम व पांडे गटात तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. केम गटातून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी उज्वला संदीप तळेकर, साडे गणातून पंचायत समिती सदस्य पदासाठी राजेंद्र बंडगर, तर पांडे गटातून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी दिपाली ढवळे हे उमेदवार रिंगणात आहेत.


या निवडणुकीत एकीकडे महायुतीतील भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्रितपणे लढत असून, दुसरीकडे करमाळा तालुका विकास आघाडी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर मैदानात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. अशा बहुपक्षीय लढतीत प्रहार जनशक्ती पक्षाने विविध छोट्या-मोठ्या पक्ष व संघटनांना सोबत घेऊन सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी, ऊस, केळी, कांदा व इतर पिकांना हमीभाव, दिव्यांगांचे प्रश्न, शेतमालाला न्याय्य दर, वंचितांना रोजगार, महिला सक्षमीकरण, तसेच ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज, शाळा व शासकीय कार्यालयांतील रखडलेली कामे मार्गी लावण्याचा मुद्दा घेऊन प्रहार जनशक्ती पक्ष निवडणूक रिंगणात उतरला आहे. समाजकल्याण विभागाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्पही पक्षाने मांडला आहे.

या पार्श्वभूमीवर होणाऱ्या जाहीर सभांमध्ये बच्चू कडू सत्ताधाऱ्यांवर कोणत्या शब्दांत हल्लाबोल करणार, तसेच शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर कोणती ठोस भूमिका मांडणार, याकडे तालुक्यातील शेतकरी, कामगार, युवक व नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रहारच्या या आक्रमक भूमिकेमुळे करमाळा तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!